लोणावळा( पुणे ) : मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी गेलेल्या तरुणाचा स्वमिंग पूलमध्ये बुडून मृत्यू झाल्याची घटना जुना खंडाळा घाटात असलेल्या एका सोसायटीच्या बंगल्यात बुधवारी (ता. ०५) पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास घडली.
निखिल निकम (वय – २२, रा. थेरगाव, पिंपरी चिंचवड) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी विशाल नानासाहेब निकम (वय- ३२, शिवराम हाईट, विष्णुदेव नगर, पुनावळे) यांनी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निखिल निकम हा पिंपरी चिंचवड येथील थेरगाव येथील राहणारा होता. तो उच्च शिक्षित असून तो आयटी कंपनीत काम करत होता. वाढदिवस साजरा करण्यासाठी जुना खंडाळा घाटातील एका बंगल्यात निखिल हा त्याच्या मित्रांसोबत आला होता. वाढदिवस साजरा करताना तो मित्रांसोबत दारू प्यायला होता. दारुच्या नशेत तो स्विमिंग पूल शेजारी गेला आणि त्याचवेळी त्याच्या तोल जाऊन तो स्विमिंग पुलमध्ये पडला.
दरम्यान, पोहता न येणे व मद्यधुंद अवस्थेत असल्यानेच स्विमिंग पूलमध्ये पडून त्याचा मृत्यू झाला. अशी माहिती पोलिसांनी दिली. मित्रांनी त्याला रुग्णालयात नेले. पण डॉक्टरांनी त्याला उपचारापूर्वीच मृत घोषित केले. दारू पिऊन कुणीही पाण्याच्या आसपास जाऊ नये स्विमिंग पुलाजवळ जाऊ नये, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. तसेच लोणावळ्यातील बंगल्यांच्या स्विमिंग पुलाच्या पाण्यात बुडून सात महिन्यांत चौघांचा मृत्यू झाला आहे.