पुणे : गुंतवणुकीच्या आमिषाने मूकबधीरांची फसवणूक करणाऱ्या मूकबधिर आरोपींच्या विरोधात न्यायालयात आर्थिक गुन्हे शाखेकडून दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणातील मूकबधीर आरोपींकडून एक कोटी रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली असून न्यायालयात जमा करण्यात आली आहे.
या प्रकरणात अमिजर सैफउद्दीन घोडनदीवाला (वय ३२), प्रदीप महारुद्र कोलते (वय २९), सुयोग सुधीर मेहता (वय ३३), चंचल सुयोग मेहता (वय ३२), धनंजय सुदामराव जगताप (वय ३९), मिहीर संतोष गोखले (वय ३६) यांच्या विरोधात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणात अटक करण्यात आलेले सहा आरोपी मूकबधीर आहेत. आरोपी सध्या येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत.
गुंतवणूक केल्यास दुप्पट परतावा देण्याचे आमिष दाखविले
आरोपींनी प्लॅटिनम इन्व्हेस्टमेंट अँड फायनान्स ग्लोबल सोल्यूशन्स आणि सुयो अभि एंटरप्रायजेस नावाने कंपन्या स्थापन केल्या होत्या. या कंपनीत मूकबधिरांनी गुंतवणूक केल्यास दुप्पट परतावा देण्याचे आमिष दाखविले होते. फसवणूक झाल्याचे उघडकीस आल्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेने कारवाई करुन शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.
पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सहआयुक्त संदीप कर्णिक, अतिरिक्त आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त भाग्यश्री नवटके, सहायक आयुक्त विजयकुमार पळसुले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक अमोल काळे, निशांत रणावरे, अजयसिंह चौहान, अर्चना चाैहान, मंगल बारवकर, संतोष भोर आदींनी तपास केला.
आरोपी, फिर्यादी, साक्षीदार मूकबधीर
फसवणूक प्रकरणातील आरोपी, साक्षीदार तसेच फिर्यादी मूकबधीर आहेत. त्यांच्याशी संवाद साधताना पोलिसांना अडचण आली होती. पोलिसांनी काैशल्यपूर्ण तपास केला. ४६७ मूकबधीर साक्षीदारांशी संपर्क साधण्यात आला. आरोपींच्या विरोधात सबळ पुरावे गोळा करण्यात आले. त्या पैकी ६० जणांकडून त्यांना परताव्यापोटी मिळालेली रक्कम जप्त करण्यात आली. एक कोटी रुपयांची रक्कम न्यायालयात जमा करण्यात आली आहे.
पोलिसांचे आवाहन
या प्रकरणातील आरोपींनी गुंतवणूकादारांना परतावा दिला आहे. ज्यांना परताव्यापोटी जास्त रक्कम मिळाली आहे. त्यांनी धनाकर्षामार्फत (डीडी) जिल्हा न्यायाधीशांकडे रक्कम जमा करावी. त्यामुळे ज्या गुंतवणुकदारांचे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यांना मदत करणे शक्य होईल, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.