हडपसर : हॉटेलमध्ये दारू पिण्यास नकार दिल्याच्या रागातून चौघांनी हॉटेल मालकाला मारहाण करून खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार हडपसर येथील काळेपडळ परिसरात घडला आहे. ही घटना शनिवारी (ता. ३१) रात्री साडेदहाच्या सुमारास घडली.
विशाल घाडगे, युजर्व सुनिल पिंगळे, शंकर घाडगे, राकेश चव्हाण अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या चौघांची नावे आहेत. याप्रकरणी सुजितकुमार संतोष जयस्वार (वय – ३० रा. ओम कॉलनी, काळेपडळ, हडपसर) यांनी वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुजितकुमार जयस्वार यांचे काळेपडळ या ठिकाणी हॉटेल आहे. त्या ठिकाणी असलेल्या हॉटेलमध्ये विशाल घाडगे याला दारु पिण्यास मनाई केली. याचा राग मनात धरुन आरोपीने त्यांच्यासोबत वाद घातला. त्यांच्या दिशेने दारुची बाटली फेकून मारून शिवीगाळ केली. तसेच त्यांना हाताने मारहाण केली.
वाद विवाद झाल्याची माहिती जयस्वार यांनी पोलिसांना दिली. जयस्वार पोलिसांना सांगितल्याच्या कारणावरुन आरोपीने त्याच्या इतर तीन साथीदारांना बोलावून घेतले. आरोपींनी हॉटेलचा बोर्ड फाडुन हॉटेल चालवायचे असेल तर दरमहा दहा हजार रुपये हप्ता मागितल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शितोळे करीत आहेत.