बीड : शेतातील वीज कनेक्शन खंडीत केल्याने त्रस्त झालेल्या एका शेतकऱ्याने सोशल मीडियावर लाईव्ह व्हिडीओ करत विष प्राशन केल्याची घटना बीडच्या गेवराई तालुक्यातील मालेगाव बुद्रुक या ठिकाणावरून समोर आली आहे.
रब्बीच्या पिकांना पाणी देण्याचे काम सुरु असतानाच महावितरणकडून कनेक्शन बंद करण्यात आले. वीज बंद केल्याने पीके पाण्याअभावी जळत आहे. त्यामुळे या शेतकऱ्याने सोशल मीडियावर लाईव्ह व्हिडिओ करत विष प्राशन केलं आहे. नारायण वाघमोडे (रा. मालेगाव, बीड) असे या शेतकऱ्याचे नाव आहे.
खरीपात झालेल्या अतिवृष्टीमुळे हातात काहीच आली नाही. त्यामुळे किमान रब्बीत तरी काही हाती येईल म्हणून नारायण वाघमोडे यांनी पेरणी करून पिके जगवली होती. मात्र सध्या पिकांना पाण्याची नितांत गरज असतानाच महावितरणकडून थकीत वीज बिल भरण्यासाठी सांगितले जात आहे. बिल न भरल्याने नारायण वाघमोडे यांच्या देखील शेतातील वीज जोडणी खंडीत करण्यात आली आहे. त्यामुळे डोळ्यासमोर पीके जळत असल्याने त्यांनी टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
शेतातील पीकं जळत असल्याने नारायण वाघमोडे यांनी शेतात जाऊन लाईव्ह व्हिडीओ केला. तसेच व्हिडीओ करतांना विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या लाईव्ह व्हिडिओ पाहून गावातील काही तरुणांच्या प्रकार लक्षात आला. त्यामुळे त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. वाघमोडे यांना बीडच्या एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. सध्या त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं डॉक्टरांनी सांगितले आहे.
महावितरणच्या एका कर्मचाऱ्याच्या त्रासाला कंटाळून वाघमोडे यांनी विषप्राशन केल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. तसेच महावितरणच्या त्या कर्मचाऱ्याविरोधात मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी देखील यावेळी करण्यात आली आहे.