लहू चव्हाण
पाचगणी : पर्यटननगरी पाचगणी शहराची ओळख असलेल्या जगप्रसिद्ध टेबल लॅंन्ड पठाराकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याच्या सिमेंट काँक्रिटीकरणाच्या कामाचा शुभारंभ टेबल लॅंन्ड व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, पदाधिकारी व मुख्याधिकारी यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
यावेळी टेबल लॅंन्ड व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष सुधाकर बगाडे, उपाध्यक्ष नामदेव चोपडे, मुख्याधिकारी गिरीश दापकेकर, माजी नगरसेवक हेन्री जोसेफ, राहूल बगाडे, अनिल राजंणे, पालिकेचे शहर अभियंता मुकुंद जोशी, कार्यालयीन निरीक्षक दिलीप रनदिवे, आरोग्य विभाग प्रमुख सुरेश मडके, बांधकाम विभाग प्रमुख रवि कांबळे, बांधकाम मुकदम सुर्यकांत कासुर्डे, नितीन मर्ढेकर, प्रविण मोरे आदी मान्यवर उपस्थित होते.
पर्यटकांचे मुख्य आकर्षण असलेल्या टेबल लॅंन्ड पठार पाॅंईटच्या रस्त्यावर नेहमी वाहनांची वर्दळ असते. त्यामुळे अनेकवेळा पर्यटकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत होता. या पठाराकडे जाणारा सुमारे सातशे मीटर लांबीचा हा रस्ता ट्रिमिक्स काॅक्रीट पध्दतीने होणार असून रस्त्याच्या कामात लोखंडी जाळी वापरण्यात येणार आहे.आवश्यक त्या ठिकाणी रस्ता रुंदीकरण करण्यात येणार आहे. पावसाळ्यात पाणी जमा होणाऱ्या ठिकाणी लोखंडी जाळीचे ग्रिटींग होणार आहे. त्याचबरोबर सुरक्षितता म्हणून रस्ता उंच होणाऱ्या ठिकाणी रेलींग करण्यात येणार आहे. सिमेंट काॅक्रीट रस्त्यामुळे टेबल लॅंन्ड पठाराच्या सौंदर्यात भर पडणार आहे.
गिरीश दापकेकर म्हणाले या कामासाठी सुमारे अडीच कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करण्यात आला असून टेबल लॅंन्ड व्यावसायिकांच्या उपजीविकेचा विचार करून कमीतकमी वेळेत दर्जेदार काम करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. सिमेंट काॅक्रीट रस्त्यामुळे टेबल लॅंन्ड पठाराच्या सौंदर्यात भर पडून व्यावसायिकांची भरभराट होणार आहे.
हेन्री जोसेफ म्हणाले मुख्याधिकारी गिरीश दापकेकर यांनी अल्पावधीतच टेबल लॅंन्ड पाॅंईटसाठी विविध विकासकामे करत कायापालट केला. दोन वर्षे कोरोनामध्ये गेली. ती त्यांना मिळाली असती तर पाचगणी हे महाराष्ट्रातील सुधारित पर्यटनस्थळ झाले असते.