पुणे : लॉटरी लागल्याचे सांगून एका महिलेला चोरटा हॉटेलमध्ये घेऊन गेला, त्यानंतर बोलण्यात गुंतवून महिलेच्या गळ्यातील गंठणचे वजन केल्यानंतर तुम्हाला फ्रिजचे रोख पैसे देतो, असे सांगून त्यांच्या गळ्यातील ७५ हजार रुपयांचे गंठण घेऊन पळून गेल्याची घटना उघडकीस आली आहे.
ही घटना सोमवारी (ता.२ ) सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमरास जांभुळवाडी येथील हॉटेल स्वाद येथे घडली आहे. याप्रकणी एका महिलेने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला यांचे जांभुळवाडी रोडच्या कडेला दुकान आहे. त्या दुकानात असताना एक व्यक्ती तेथे आला. तुम्हाला लॉटरी लागली आहे़ लॉटरीमध्ये टिव्ही, स्कुटी, फ्रिज या वस्तू लागल्या आहेत. त्या तुम्हाला द्यायच्या आहेत. त्यासाठी तुम्हाला माझ्यासोबत कुपन घेण्यासाठी यावे लागेल, असे सांगून त्यांना हॉटेल स्वाद मध्ये घेऊन गेला.
त्यानंतर फिर्यादी महिलेला त्याने बोलण्यात गुंतवून गळ्यामध्ये असलेले सोन्याचे गंठण काढून देण्याची मागणी केली. महिलेने गंठन देण्यासाठी नकार दिला. तुला सोन्याचे गंठण कशासाठी पाहिजे आहे, असे महिलेने विचारले असता,
त्यावर त्याने त्याचे वजन करावयाचे आहे. त्यानंतर मी तुम्हाला फ्रिजचे रोख रक्कम देणार देतो, असे सांगितले.
दरम्यान, महिलेने विश्वास ठेवून गळ्यातील ७५ हजार रुपयांचे अडीच तोळ्याचे गंठण काढून त्याच्या हातात दिले. त्यानंतर त्याने हॉटेलमध्ये बसलेल्या लोकांकडे हात करुन ते लोक पैसे देतील, असे सांगून वजन करुन येतो, असे सांगत तो तेथून निघून गेला. बराच वेळ झाला तरी तो परत न आल्याने आपली फसवणूक झाल्याचे महिलेच्या लक्षात आले. त्यानंतर महिलेने फिर्याद दिली. या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.