पुणे : पुण्यातील प्रसिद्ध उद्योजक नानासाहेब गायकवाड यांच्या पत्नी नंदा गायकवाड व दिपा पवार यांचा जामीन अर्ज मोक्काचे अतिरिक्त विशेष न्यायाधीश पी. पी. जाधव यांनी फेटाळला आहे. फिर्यादी यांच्या वतीने अॅड. हृषिकेश धुमाळ आणि सरकारी वकील राजेश कावेडिया यांनी कामकाज पाहिले आहे. तर आरोपींच्या बाजूने अॅड. हर्षद निंबाळकर यांनी कामकाज पाहिले.
व्याजाच्या पैशाच्या कारणावरून पिंपळे सौदागर एका जेष्ठ महिलेची जबरदस्तीने जमीन व जागा बळकवण्यासाठी तिच्या मुलाच्या डोक्याला रिव्हॉल्व्हर लावून बळजबरीने स्टॅम्प पेपर, लिहिलेले पेपर, कोरे पेपर यावर सह्या घेतल्याच्या आरोपावरुन नंदा गायकवाड व दीपा पवार या अटकेत आहेत. फिर्यादी महिलेच्या मुलाने आरोपीकडून व्याजाने पैसे घेतले होते.
या व्याजाच्या पैशाच्या कारणावरून आरोपींनी फिर्यादीची रायगड जिल्ह्यातील आतोणे (ता. सुधागड) येथील साडेसात एकर जागा व पिंपळे सौदागर येथील फिर्यादीच्या नावावर असलेली जागा स्वतःच्या नावावर करुन घेण्यासाठी डिसेंबर २०२० मध्ये त्यांच्या मुलाला गायकवाड याने आपल्या राहत्या घरी बोलावले. त्या ठिकाणी आरोपी नानासाहेब गायकवाड यांनी त्यांच्याजवळ रिवॉल्वरने हवेत गोळीबार करून फिर्यादीच्या मुलाच्या डोक्याला रिव्हॉल्व्हर लावून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. तसेच जबरदस्तीने स्टॅम्प पेपर, लिहिलेले पेपर, कोरे पेपर यावर सह्या व अंगठे घेऊन त्यांना डेक्कन येथील आरोपी सोनाली गवारे तिच्या घरात काही काळ डांबून ठेवत मारहाण केली होती.
याबाबत ६२ वर्षीय महिलेने चतुश्रृंगी पोलीस स्टेशनला फिर्याद दिली होती. त्यानुसार नानासाहेब गायकवाड, नंदा नानासाहेब गायकवाड, गणेश नानासाहेब गायकवाड, सोनाली दीपक गवारे, दीपक गवारे, राजू उर्फ अंकुश दादा, सचिन गोविंद वाळके, संदीप गोविंद वाळके, दिपा पवार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
यावेळी नंदा गायकवाड हिने एकाच चेकद्वारे अनेक ठिकाणच्या जमीन खरेदीचे दस्त केल्याचे अॅड. कावेडीया यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. तर गायकवाड कुटुंबीयांच्या घराच्या झडतीमध्ये पोलिसांना काही मुद्देमाल सापडला होता. कागदपत्रे, लोकांकडून जबरदस्तीने लिहून घेतलेले दस्तावेज, बेहिशोबी मालमत्ता, रोख रकमा या आरोपींनी नियोजनबद्धरित्या कट रचून अनोळखी ठिकाणी लपवून ठेवलेल्या होत्या.
दरम्यान, हे सर्व दस्ताऐवज लपवण्यामध्ये दिपा पवार हिचा मुख्य सहभाग असल्याचे दिसून आल्यानंतर दिपा पवार उर्फ गायकवाड हिच्यावर गुन्हा दाखल करुन अटक केली गेली होती. त्यानंतर मोक्कातील आरोपी नानासाहेब गायकवाडसह त्याच्या टोळीतील सदस्यांची सर्व वैध अवैध पद्धतीने मासिक उलढाल ही १०० कोटींच्या घरात असल्याचे धक्कादायक सत्य उजेडात आले होते.