लोणी काळभोर, (पुणे) : “प्रिंट व डिजीटल मिडीया पत्रकार संघाच्या पुणे जिल्हाध्यक्षपदी बाप्पुसाहेब उर्फ राजेंद्र काळभोर यांची तर हवेली तालुकाध्यक्षपदी संदीप बोडके यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रदेश प्रिंट व डिजिटल मीडिया पत्रकार संघाचे अध्यक्ष सूनील जगताप यांनी रविवारी (ता. १) हि घोषणा केली.
कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील लोणी स्टेशन येथील “पुणे प्राईम न्यूज” या कार्यालयात सूनील जगताप यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जगताप यांनी हि घोषणा केली. त्याचबरोबर हवेली तालुका प्रिंट व डिजीटल मीडिया पत्रकार संघाच्या कार्याध्यक्षपदी सचिन सुंबे, उपाध्यक्षपदी चंद्रकांत दुंडे, अमोल अडागळे, समन्वयकपदी अमोल भोसले, सरचिटणीसपदी जितेंद्र आव्हाळे व खजिनदारपदी श्रीनिवास पाटील यांची निवड करण्यात आल्याची घोषणा नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष बापू काळभोर व नवनिर्वाचित हवेली तालुका अध्यक्ष संदीप बोडके यांनी केली. यावेळी तुळशीराम घुसाळकर, विजय काळभोर, सुनील तुपे, सुधीर कांबळे, विशाल कदम, हनुमंत चिकणे आदी उपस्थित होते.
दरम्यान, उपस्थित पत्रकार बांधवाना पत्रकार संघाच्या ध्येयधोरणांविषयी सोशल मिडीयाचे जिल्हाध्यक्ष जनार्दन दांडगे यांनी मार्गदर्शन केले. ज्येष्ठ पत्रकार तुळशीराम घुसाळकर यांनी पत्रकार सदस्यांना येणाऱ्या समस्या व पुढे संघाची रणनीती याबाबत मार्गदर्शन केले. तसेच या नव्या संघटनेची ध्येय, धोरणे, भविष्यातील वाटचाल या विषयावर या बैठकीत चर्चा करण्यात आली. तर संघाच्या कार्याची माहितीहि यावेळी देण्यात आली.
याबाबत बोलताना नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष बाप्पू काळभोर म्हणाले, “समाजासाठी आणि लोकशाहीसाठी जगणाऱ्या वागणा-या पत्रकारांच्या सर्वांगीण विकासासाठी “प्रिंट व डिजीटल मिडीया पत्रकार संघ” हि नवीन पत्रकार संघटना सदैव प्रयत्न करणार आहे. तसेच पत्रकारांना आर्थिक स्थैर्य मिळवून देण्यासाठी हि संघटना काम करणार आहे. एकटा माणूस काम करण्यास मर्यादा येतात, त्यामुळे संघटीत राहुन एकत्रितपणे काम करण्यास या संघटनेमध्ये भर देण्यात आहे.
याबाबत बोलताना नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष संदीप बोडके म्हणाले, “नव्या पत्रकार संघाच्या माध्यमातून पत्रकारांच्या हितासाठी प्रयत्न करणार असून पत्रकारांचे संघटन वाढीसाठी सर्वांना सोबत घेऊन वरिष्ठ पत्रकारांच्या मार्गदर्शनाखाली पुढील वाटचाल सुरु ठेवणार आहे.