पुणे – आपल्या ६ महिन्याच्या चिमुरड्याचा सहारा घेवुन मोबाईल चोरी करणाऱ्या महिलेला समर्थ पोलिसांनी अटक केली असून पोलिसांनी महिलेकडून १ लाख ४० हजार रूपये किंमतीचे १२ हॅन्डसेट जप्त केले आहेत.
समर्थ पोलिस ठाण्याच्या हद्दीत ३१ डिसेंबरच्या अनुषंगाने सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रसाद लाणारे, महिला उपनिरीक्षक मिरा त्रंबके, महिला पोलिस नाईक रूपाली काळे आणि तपास पथकातील पोलिस अंमलदार हे परिसरात पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी महिला उपनिरीक्षक मिरा त्रंबके यांना एक मोबाईल चोर महिला आपल्या बाळाचा सहारा घेवून चोर्या करीत असल्याची माहिती मिळाली.
त्रंबके यांनी महिलेला ताब्यात घेवून तिच्याकडे सखोल चौकशी केली. त्यावेळी सुरूवातीला महिलेने उडवाउडवीची उत्तर दिली. बराच वेळ चौकशी केल्यानंतर तिच्याकडे १२ महागडे मोबाईल हॅन्डसेट मिळाले. रेल्वेमध्ये प्रवास करताना व पुणे शहरात गर्दीचा फायदा घेवुन सदरील मोबाईल चोरल्याची महिलेने कबुली दिली.
ही महिला मुळची उत्तरप्रदेशातील असून सध्या तिचे वास्तव्य दिल्ली येथे आहे. दिल्लीवरून एखाद्या रेल्वेने प्रवास करत असताना ती चोर्या करीत होती. तिने पुणे शहरात महिलांच्या पर्समधुन महागडे मोबाईल चोरल्याचे तपासात निष्पन्न झाले.
उपायुक्त संदीप सिंह गिल्ल, सहाय्यक आयुक्त सतीश गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली समर्थ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक रमेश साठे, पोलिस निरीक्षक (गुन्हे) प्रमोद वाघमारे यांच्या सुचनेनुसार तपास पथकातील सहाय्यक निरीक्षक प्रसाद लाणारे, महिला उपनिरीक्षक मिरा त्रंबके, महिला पो.ना. रूपाली काळे, पोलिस अंमलदार हेमंत पेरणे, रहिम शेख, कल्याण बोराडे, दत्तात्रय भोसले, गणेश वायकर, प्रमोद जगताप, रोहिदास वाघीरे, सुभाष पिंगळे, श्याम सुर्यवंशी यांच्या पथकाने ही कारवाई केली.