चाकण एमआयडीसी : चाकण एमआयडीसीतील ए रेमॉंड इंडिया या कंपनीने आपल्या सीएसआर निधीच्या माध्यमातून खेड तालुक्यातील शेवटच्या टोकाला असलेल्या तांबडेवाडी या आदिवासी गावाला पिण्याच्या पाण्याची सोय केली आहे. “यासाठी हुतात्मा राजगुरू पत्रकार संघाने विशेष प्रयत्न केल्याने आदिवासी महिलांच्या डोक्यावरील हंडा उतरला”, असे प्रतिपादन ए. रेमॉंड इंडीया कंपनीच्या व्यवस्थापिका रंजना गायकवाड यांनी केले.
रंजना गायकवाड म्हणाल्या, “आम्ही सीएसआर निधी टाकण्यासाठी गावाच्या शोधात असताना पत्रकार हनुमंत देवकर यांनी तात्काळ १०० टक्के आदिवासी लोकवस्ती असलेल्या तांबडेवाडीचे नाव सुचवले. येथील पिण्याच्या पाण्याची योजना विस्कळीत झाल्याने ग्रामस्थांची गैरसोय होत आहे व महिलांना डोक्यावर हंडा घेऊन विहिरीवरून पाणी आणावे लागत असल्याचे सांगितले. आम्ही लगेच कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक मनीष पधारीया यांच्याकडे ही व्यथा मांडली, आणि त्यांनी लगेच होकार दिला. देवकर यांनी पाठपुरावा करून हे काम जून महिन्यात पूर्ण केले. आज ही योजना लोकार्पण करताना आदिवासींच्या चेहऱ्यावरील आनंद आम्हाला सदैव लक्षात राहील. हे गाव निसर्गाच्या कुशीत असून लवकरच आंम्ही दत्तक घेण्याचा प्रयत्न करू.”
ए. रेमॉंड इंडीया कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक मनीष पधारीया यांच्या मार्गदर्शनाखाली ४५० लोकवस्ती असलेल्या तांबडेवाडी या आदिवासी गावात सीएसआर निधी देऊन दहा हजार लिटर पाण्याची टाकी व नळ जोडणी करून पिण्याच्या पाण्याची व्यावस्था केली. कंपनीच्या व्यवस्थापिका रंजना गायकवाड व हुतात्मा राजगुरू पत्रकार संघाचे अध्यक्ष हनुमंत देवकर यांच्या हस्ते या उपक्रमाचे उदघाटन करण्यात आले. महिला अत्याचार तक्रार निवारण समिती एनडीआरएफ गृह मंत्रालयाच्या केंद्रीय सदस्या मंगलताई देवकर प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. यावेळी सरपंच जयश्री सावंत, उपसरपंच आशा निधन, गणेश सावंत, माजी उपसरपंच कैलास निधन व ग्रामस्थ उपस्थित होते.
दरम्यान, सरपंच सावंत यांनी उपस्थित मान्यवरांना बुके ऐवजी गुलाबाची रोपे देऊन स्वागत करून पर्यावरणाचाही संदेश दिला. तर माजी उपसरपंच कैलास निधन यांनी आभार मानले. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पाण्याची टाकी सभोवताली सुशोभीकरणसाठी फुलझाडांचे रोपण करण्यात आले.