पारगाव : आंबेगाव तालुक्याच्या खडकवाडी या लहानशा गावातील सामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या समीर किसन भागवत या तरुणाने केंद्र शासनाच्या वतीने केंद्रीय अन्न सुरक्षा अधिकारी या पदासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेत संपूर्ण देशभरातून प्रथम क्रमांक मिळवून ‘केंद्रीय अन्न सुरक्षा अधिकारी’ म्हणून निवडून आला.
भारत सरकारच्या केंद्रीय अन्न सुरक्षा अधिकारी – आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय यांच्या वतीने केंद्रीय अन्न सुरक्षा अधिकारी या पदासाठी घेण्यात येणारी प्राथमिक परीक्षा ३० मार्च २०२२ रोजी दिल्यानंतर समीरने मुख्य परीक्षा १ ऑक्टोबर २०२२ दिली. या परीक्षेसाठी देशातून ४० हजार परीक्षार्थी बसले होते या परीक्षेत तो प्रथम क्रमांकाने उतीर्ण होऊन त्याची केंद्रीय अन्न सुरक्षा अधिकारी पदी निवड झाली आहे.
समीर भागवतचे प्राथमिक शिक्षण खडकवाडी गावातच जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत झाले. माध्यमिक शिक्षण धामणी गावातील श्री. शिवाजी विद्यालय आणि ज्युनिअर कॉलेज मध्ये झाले. पुढे त्याने नागपूर महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठामधुन बी.टेक (डेरी टेक्नॉलॉजी) पदवी संपादन केली.त्यानंतर राष्ट्रीय दुग्ध संशोधन संस्था, कर्णाल मधून एम्. टेक (डेरी टेक्नॉलॉजी) पदवी संपादन केल्यानंतर मागील चार वर्षांपासून समीर भागवत गुजरात सहकारी दुग्ध वितरण संघ लिमिटेड (अमुल) मध्ये कार्यकारी अधिकारी (गुणवत्ता विभाग) पदावर कार्यरत आहे.
या परीक्षेत सहभागी झालेल्या ४० हजार परीक्षार्थी मधून समीर याने प्रथम क्रमांक पटकाविला आहे. त्याची ‘केंद्रीय अन्न सुरक्षा अधिकारी’ पदी निवड झाल्यामुळे त्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे