पुणे :- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रीमंडळात कॅबिनेट मंत्रीपद देण्याचे आमिष दाखवुन, राज्यातील चार आमदारांना प्रत्येकी शंभर कोटी रुपयांचा गंडा घालण्याचा प्रयत्न एका टोळीकडुन दोन दिवसापुर्वी करण्यात आला होता. मात्र दौंडचे आमदार अॅड. राहुल कुल यांच्या चाणाक्षपणामुळे, राज्यातील चार आमदारांना गंडा घालु पहाणाऱ्या चार ठगांना गजाआड़ व्हावे लागले आहे.
आमदार राहुलदादा कुल यांच्या वरील कामगिरीमुळे, त्यांच्या मतदार संघात “दादांचे शिक्षण वकीलीचे, काम गुप्तहेराचे, लयं हुशार आमदार दौंडचे त्यांनी चौघांना बनवले पाहुणे पोलीसांचे” अशा प्रतिक्रिया उमटु लागल्या आहेत.
दरम्यान, आमदार अॅड. राहुलदादा कुल यांच्या चाणाक्षपणामुळे रियाज अल्लाबक्ष शेख (वय ४१, कोल्हापूर), योगेश मधुकर कुलकर्णी (वय ५७, पाचपाखाडी, ठाणे), सागर विकास संगवई (वय ३७, पोखरण रस्ता, ठाणे) व जाफर अहमद रशीद अहमद उस्मानी (वय ५३, नागपाडा, मुंबई) या चार ठगांना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी राहुल कुल (Rahul Kul) यांचे खासगी सचिव ओंकार बाळकृष्ण थोरात यांनी आमदारांच्या फसवणुकीबाबत पोलिसात तक्रार दिली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सकारच्या मंत्रीमंडळ विस्ताराकडे सध्या सर्वांचे लक्ष लागून राहिले असुन, शिंदे गटातील व भारतीय जनता पक्षाचे अनेक आमदार मंत्रीपदासाठी ‘नंदनवन’ आणि ‘सागर’ या शासकिय बंगल्याकडे लक्ष ठेवून आहेत. तर कांहीजण आपआपल्या जिल्हातील वरीष्ठ नेत्यांच्या माध्यमातुन मंत्रीपदासाठी शिंदे व फडवणविस यांच्याकडे लॉबिग करत आहेत. नेमक्या याच संधीचा फायदा घेत वरील चार आरोपींनी आमदार राहुलदादा कुल यांनाही संपर्क केला होता.
दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांच्याशी राहुलदादा कुल यांचे चांगलेच सख्य असल्याने, दादांनी त्यांच्याकडे मंत्रीपदासाठी होत असलेल्या पैशाची कहानी तात्काळ फडणविस यांना ऐकवली. यावर फडणविस यांनीही वरील बाब पोलिसांच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांना कळवुन, योग्य ती कारवाई करण्याच्या सुचना पोलिसांना दिल्या होत्या. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून फोन करणाऱ्या व्यक्तीला हॉटेल ओबेरॉय येथून ताब्यात घेतले. त्यानंतर आणखी तिघांना अटक करुन गजाआड केले.