(अजित जगताप)
सातारा : छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले व छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांच्या मार्गदर्शनाखाली पुणे जिल्ह्यातील भीमा- कोरेगाव या ठिकाणी विजयी स्तंभाला अभिवादन करण्यासाठी गावपातळीवर जय्यत तयारी सुरू झालेली आहे.
सातारा जिल्ह्यातून किमान दहा हजार भीमसैनिक दरवर्षीप्रमाणे यावर्षीही दिनांक १ जानेवारी रोजी भीमा- कोरेगाव येथे विजय स्तंभाला अभिवादन करण्यासाठी नियोजन करत आहेत.
ब्रिटिशांनी या देशावर दीडशे वर्षे राज्य केले. परंतु, खऱ्या अर्थाने त्याकाळी समता- स्वातंत्र्य- बंधुत्वाचा नारा दिला असता तर ब्रिटिशांना हुसकावून लावण्यासाठी महार पूर्वजांनीही लढा दिला असता परंतु त्यांना कोणताही अधिकार नसल्यामुळे त्यांना शौर्य दाखवण्यासाठी ब्रिटिशांनी त्यांचा योग्य वापर करून क्रांती केली. त्या क्रांतीचे नाव म्हणजे भीमा- कोरेगाव असे कोरले गेले आहे.
या भीमा- कोरेगावला अलीकडच्या काळात अत्यंत महत्त्व आलेला आहे. त्यामुळे भीमसैनिक चैत्यभूमी, दीक्षाभूमी व त्यानंतर भीमा- कोरेगावातील विजयी स्तंभाला अभिवादन करून प्रेरणा घेतात, अशी माहिती लोक जनशक्ती पक्षाचे मुंबई प्रदेशाध्यक्ष प्रेमानंद जगताप, रिपब्लिकन पक्षाचे नेते प्रतिक गायकवाड यांनी दिली.
सातारा जिल्ह्यातील भिमसैनिकांनी पुणे-शिवाजी नगर-नगर रस्ता किंवा कात्रज- कोंडवा मार्गी नगर रस्ता अशा पद्धतीने भीमा-कोरेगाव येथे यावे. त्याठिकाणी वाहन तळे व विजयी स्तंभाकडे जाण्यासाठी पुणे जिल्हा प्रशासनाने सोय केली आहे. भीमसैनिकांनी नियम व शिस्तीचे पालन करावे अशी विनंती रिपब्लिकन पक्षाचे नेते अजित कंठे यांनी केली आहे.