लहू चव्हाण
पाचगणी : सिध्दनाथवाडी (ता. वाई) येथील महाविद्यालयीन बेपत्ता असलेल्या १७ वर्षीय तरुणाचा कोयत्याने सपासप वार करून डोक्याचे तुकडे करून खून केल्याची धक्कादायक घटना नुकतीच उघडकीस आली आहे. अमानुषपणे हत्या झाल्याने वाई शहरासह एकच खळबळ उडाली आहे.
न्यायास शिवाजी खरात (वय- १७) असे खुन झालेल्या महाविद्यालयीन तरुणाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सिध्दनाथवाडीतील न्यायास शिवाजी खरात हा १२ वीचे शिक्षण घेण्यासाठी शिरवळ येथे जात होता. बुधवारी (ता. २८) रात्री दहा वाजल्यापासून तो घरातुन बेपत्ता झाला होता. हि माहिती वाईचे पोलिस निरिक्षक बाळासाहेब भरणे यांना समजताच त्यांनी त्याचा मोबाईल लोकेशनचा आधार घेत शोध मोहीम सुरू केली होती.
अखेर पहाटेच्या दरम्यान धोम धरणाच्या उजव्या कालव्याच्या डाव्या बाजूकडे मधुकर चौधरी यांच्या शेतजमीनीत डोक्याचे तुकडे केलेल्या अवस्थेत न्यायासचा मृतदेह आढळून आल्याने आईसह कुटुंबियांचा आक्रोश पाहून उपस्थितीत नागरिकांचे अश्रुंचे बांध फुटले.
दरम्यान, घटनास्थळी वाईच्या उपविभागीय पोलिस अधिकारी शितल जानवे खराडे, वाई पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक बाळासाहेब भरणे, सहाय्यक पोलिस निरिक्षक रवींद्र तेलतुंबडे, पाचगणीचे सहाय्यक पोलिस निरिक्षक सतीश पवार, महिला फौजदार सोमदे व पोलिस कर्मचारी उपस्थित आहेत. आरोपींचा शोध घेण्यासाठी डॉगस्कॉड व ठसेतज्ञांना पाचारण करण्यात आले आहे.