खेड : लोटे (ता. खेड) येथील थर्मोलॅब कंपनीने ३२ कामगारांना मंगळवारी (ता. २७ डिसेंबर) अचानक कामावरून काढून टाकले आहे. या कामगारांमध्ये ५ महिलांचा समावेश आहे. कंपनीने अचानक घेतलेल्या निर्णयामुळे कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नेहमीप्रमाणे सकाळच्या पाळीत काम करण्यासाठी कंपनीत कामगार आले होते. तेव्हा कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कामगारांना प्रवेशद्वारावरच रोखले व तुम्हाला आजपासून कामावर येण्यास बंदी असल्याचे सांगितले.
त्याचबरोबर तशा प्रकारची सूचना नोटीस त्यांनी प्रवेशद्वारावर लावल्याचेही सांगितले. कर्मचाऱ्यांनी व्यवस्थापनाला खूप विनंती केली. मात्र, व्यवस्थापन आपल्या निर्णयाशी ठाम राहिले आहे. तसेच कार्यालयीन कर्मचारी व व्यवस्थापकालाही कमी करण्यात आले आहे.
कंपनीने सांगितले आहे कि, तुमचा या महिन्याचा पगार, सर्व लिगल ड्युज व दोन महिन्यांची ग्रॅज्युइटी असा सर्व हिशोबाचा धनादेश तयार आहे. तो घेऊन घरी जावे. इथून पुढे कामावर येऊ नये. आम्ही कंपनी बंद करीत आहोत, असे सांगितले.
दरम्यान, कंपनीत अन्य एका विभागात ठेकेदारी पद्धतीचे काम सुरू आहे. त्या कामगारांचे काय? गेली तीस वर्षांहून अधिक काळ काम केलेल्या कामगारांना केवळ दोन महिन्याची ग्रॅज्युइटी ? काही कामगार एका युनियनचे सभासद असून, युनियनच्या वरिष्ठांशी चर्चा करूनच निर्णय घेणार असल्याचे सांगितले.