पुणे : लिलाव भिशीतून चांगला मोबदला देण्याच्या आमिषाने वेळोवेळी पैसे घेऊन तिघांची तब्बल ६७ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना कोंढव्यातून समोर आली आहे.
याप्रकरणी कोंढवा येथील प्रकाश प्रजापती (वय २९, रा. दर्शन सोसायटी, साईनगर, कोंढवा) यांनी समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी शंकर लक्ष्मण गायकवाड (रा. गणपती मोरेश्वर अपार्टमेंट, रास्ता पेठ) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शंकर गायकवाड याने फिर्यादी यांच्याकडे लिलाव भिशी लावा त्यातून चांगला मोबदला मिळवून देईल, असे आमिष दाखविले. तसेच त्यांच्याकडून ऑनलाईन व रोख स्वरुपात ११ लाख ५४ हजार ६५१ रुपये घेतले. दिलेल्या रकमेची कोणतीही पावती दिली नाही.
तसेच गायकवाड याने फिर्यादीकडून उसने म्हणून १४ लाख ३० हजार रुपये घेतले. हा प्रकार २०२० पासून आतापर्यंत घडला आहे.
दिलेल्या पैशाचा कोणताही मोबदला न देता एकूण ३२ लाख रुपयांची फसवणूक केली.त्यांच्याप्रमाणेच राहुल वनारसे यांची २५ लाख ५० हजार रुपये व आशाराणी नायकवडी यांची १० लाख रुपयांची फसवणूक केली.
पोलीस उपनिरीक्षक त्र्यंबके तपास करीत आहेत.