पुणे : बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात महाराष्ट्र मिनी ऑलिम्पिक स्पर्धां २ ते १२ जानेवारी २०२३ यादरम्यान होणार आहे. या स्पर्धेचे आयोजन महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे.
पुण्यामध्ये ही स्पर्धा होणे हे गौरवशाली असून यानिमित्ताने पुण्याचे क्रीडा वैभव आणि क्रीडा क्षेत्राची ओळख देशपातळीवर पोहोचविण्याची मोठी संधी आहे.
महाराष्ट्र मिनी ऑलिम्पिक या स्पर्धेत ३९ खेळ प्रकारांचा स्पर्धेत समावेश आहे. यात बालेवाडी येथे २१ खेळ प्रकारांचे आयोजन करण्यात आले आहे. तर नागपूर-४, जळगाव-४, नाशिक-२, मुंबई, बारामती, अमरावती, औरंगाबाद, सांगली व पुणे परिसरात एमआयटी, विमाननगर व पूना क्लब येथे प्रत्येकी १ याप्रमाणे खेळ प्रकारांचे आयोजन केले आहे.
महाराष्ट्र राज्याला क्रीडा संस्कृतीचा मोठा वारसा आहे. क्रीडा धोरण राबविणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे. तसेच क्रीडाविषयक पायाभूत सुविधा निर्माण व विकसित करण्यासाठी महाराष्ट्र राज्य देशात अग्रेसर आहे.
आंतरराष्ट्रीय क्रीडा जगतातील घडामोडीचा वेध घेवून भविष्यात करावयाच्या कार्यप्रणालीसंबंधात राज्य शासनाने क्रीडा धोरण आखले असून, २०१२ सालापासून त्याची अंमलबजावणी करण्यात येत आहे.
दरम्यान, राज्याचे क्रीडा मंत्री गिरीष महाजन यांच्या मार्गदर्शनात या स्पर्धेचे आयोजन होत आहे. तर विभागीय आयुक्त सौरभ राव आणि क्रीडा आयुक्त सुहास दिवसे स्पर्धेच्या आयोजनासंबधी लक्ष ठेवून आहेत.