नाशिक : राज्यात एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यापासून शिंदे गटात प्रवेश करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. यामध्ये सर्वात जास्त उद्धव ठाकरे यांच्या गटातील नेत्यांची संख्या जास्त असताना नाशिकमधून मनसे पदाधिकारी देखील शिंदे गटात प्रवेश करत आहेत. त्यामुळे शिंदे गटाचा फटका दोन्ही ठाकरे बंधूना बसत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांचे एकमेकांशी चांगले संबंध असून देखील नाशिकमधील स्थानिक नेते व कार्यकर्ते शिंदे गटात प्रवेश करत असल्याने मनसेत देखील पडझड पाहायला मिळत आहे. सध्या अमित ठाकरे हे नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना पक्षाचा मोठा नेता शिंदे गटात सामील होत असल्याने मनसेला नाशिकमध्ये मोठे खिंडार पडत आहे.
अंतर्गत वादाचा मोठा फटका
यापूर्वी देखील मनसेचे पदाधिकारी शिंदे गटात सहभागी झाले होते. यात माजी नगरसेवक व दोन पदाधिकाऱ्यांचा समावेश होता. साध्याच्य घाडीला मनसेचा एक खांदा समर्थक शिंदे गटात प्रवेश करत आहे. याला देखील अंतर्गत वादांची पार्श्वभूमी असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर मनसेला भगदाड पडत असल्याने नक्की संघटन बांधणीमध्ये कशा प्रकारचे बदल होतात हे पाहणे महत्वाचे आहे.
अमित ठाकरे व मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरे हे दोघेही सातत्याने नाशिकमधील पदाधिकाऱ्यांच्या संपर्कात असतात. असे असून देखील पदाधिकारी पक्षाला जय महाराष्ट्र करत असल्याने हे मनसेसाठी चिंतेची बाब आहे.