पुणे : प्रेयसीसोबत संसार थाटण्यासाठी स्वतःच्या खुनाचा बनाव रचून दुसऱ्याला रोटर मशीनमध्ये चिरडून हत्या केल्याची धक्कादायक घटना चहोली खुर्द (ता. खेड) ग्रामपंचायत हद्दीत शुक्रवारी (ता. १६ डिसेंबर) घडली आहे. याप्रकरणी आळंदी पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत.
रवींद्र भिमाजी घेनंद (वय – ४८) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर सुभाष उर्फ केरबा छबन थोरवे (वय ६५ रा. च-होली) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी निखील रवींद्र घेनंद (वय २८ रा. धानोरे, खेड) यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
वरीष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल गोडसे यांनी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रवींद्र घेनंद यांचा मृतदेह पोलिसांना आढळला होता. पोलिसांना हा अपघात नसून घातपात असल्याचा संशय आला होता. त्याअनुषंगाने पोलिसांनी तपास केला असता, धक्कादायक माहिती समोर आली. सदर खुनाचा उलघडा करण्यास पोलिसांना यश आले आहे.
आरोपी सुभाष उर्फ केरबा थोरवे याचे एका महिलेसोबत प्रेमसंबंध होते. आरोपीला त्याचा प्रेयसीसोबत दूर कोठे तरी जाऊन संसार थाटायचा होता. यासाठी आरोपीला त्याच्याच मृत्यूचा बनाव बनवायचा होता. त्यानंतर आरोपीने त्याच्या प्रेयसीसोबत मिळून एक डाव रचला.
त्यानुसार आरोपींनी रवींद्र घेनंद याचा विश्वास संपादन केला. घेनंद यांना सुभाष ज्ञानोबा थोरवे यांच्या शेतात बोलावले. आरोपींनी घेनंद यांचे कोयत्याने मुंडके कापले, मृतदेहाच्या अंगावर स्वतःचे कपडे घातले. तसेच शेतात काम करावयाच्या ट्रॅक्टरला जोडलेल्या रोटर मशीनमध्ये मृतदेह घालून तो फिरवला. त्यानंतर हा अपघात असल्याचा बनाव रचला. व मृतदेहाचे मुंडके, कोयता, व अंगावरचे कपडे लपवून ठेवत पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान, पोलिसांना सदर हा अपघात नसून घातपात असल्याचा संशय आला. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून सदर खुनाचे भिंग फोडले. आणि पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवलाळ्या आहेत.