उरुळी कांचन, (पुणे) : पुणे- सोलापूर महामार्गावरील सहजपूर (ता. दौंड) ग्रामपंचायत हद्दीत एसटी व दुचाकी यांच्यात झालेल्या भिषण अपघातात २३ वर्षीय तरुणाचा जागेवरच मृत्यू झाला आहे. मंगळवार (ता. २७) दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे.
हर्षद अनिल पांगारकर (वय- २३, रा. पांगारे वस्ती, सहजपुर, ता. दौंड) असे जागेवरच मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे- सोलापूर महामार्गावरून हर्षद हा उरुळी कांचन (ता. हवेली) या ठिकाणी दुचाकीवरून निघाला होता. यावेळी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास हर्षद हा सहजपुर ग्रामपंचायत हद्दीतील सहजपुर फाट्यावरून एस टी बसच्या पुढे जाण्याचा प्रयत्न करीत होता.
हर्षद चालवित असलेल्या दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने तो थेट एस. टी. च्या पाठीमागील चाकाच्या खाली त्याची दुचाकी गेल्याने त्याचा जागेवरच मृत्यू झाला.
दरम्यान, सदर घटनेची माहिती मिळताच उरुळी कांचन येथील कस्तुरी प्रतिष्ठाणच्या सदस्यांनी तात्काळ रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली. त्यानुसार त्याला ग्रामीण रुग्णालय यवत या ठिकाणी उपचारासाठी दाखल केले मात्र डॉक्टरांनी उपचारापूर्वीच निधन झाल्याची माहिती दिली.
घटनास्थळी यवत पोलीस दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे.