पुणे : पुणे शहरातील हडपसर येथे झालेल्या बेकायदा दस्तनोंदणीचे लोण राज्यभर पसरले आहे. याप्रकरणी पुण्यासह राज्यातील सात जिल्ह्यांतील संबंधित अधिकारी, कर्मचार्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधिमंडळात दिली.
राधाकृष्ण विखे पाटील की, ‘राज्यात गेल्या दोन वर्षांत तुकडेबंदी कायदा आणि स्थावर संपदा तथा मालमत्ता (विकास आणि नियमन) कायदा (रेरा) या दोन्ही कायद्यांचे उल्लंघन होत आहे. तसेच सक्षम प्राधिकरणाच्या बोगस ना-हरकत प्रमाणपत्राच्या आधारे दहा हजार ६३५ मालमत्तांची बेकायदा दस्तनोंदणी केल्याची बाब आहे.
शहरात तुकडेबंदी कायदा आणि रेरा या दोन्ही कायद्यांचे उल्लंघन करून दस्तनोंदणी करण्यात आल्याचे तपासणीनंतर निदर्शनास आले. त्यानंतर पुणे शहरातील सर्व २७ दस्तनोंदणी कार्यालयांत नोंदविण्यात आलेल्या दस्तांची तपासणी करण्यासाठी तपासणी पथकाचे गठण राज्य शासनाकडून करण्यात आले होते.
दरम्यान, या तपासणी पथकाने केलेल्या तपासणीत तुकडेबंदी कायदा आणि रेरा या दोन्ही कायद्यांतील तरतुदींचे पालन न करता दहा हजार ५६१ दस्तांची नोंदणी झाल्याचे उघडकीस आले. पुणे शहरातील सर्व २७ दस्तनोंदणी कार्यालयांच्या तपासणीत बेकायदा दस्तनोंदणी केलेल्या दोषी अधिकारी, कर्मचार्यांवर निलंबन, बदली, विभागीय चौकशी, समज अशा स्वरूपाची कारवाई करण्यात आली आहे. अशी माहिती देखील राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे.