पालघर : वीज वापरात अनियमितता असल्याने कारवाई टाळण्यासाठी पालघर येथील महावितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता आणि कार्यकारी अभियंत्याला १ लाख रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी (ता.२६) सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास रंगेहाथ पकडले आहे.
अधीक्षक अभियंता किरण नागावकर व कार्यकारी अभियंता प्रताप मचिये असे लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आलेल्या अधिकाऱ्यांची नावे आहेत. याप्रकरणी एका व्यक्तीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांच्या वीज वापरात अनियमितता असल्याच्या तक्रारी महावितरण कंपनीच्या पालघरच्या अधीक्षक अभियंता किरण नागावकर यांच्याकडे तक्रारी आल्या होत्या. त्यानंतर महावितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता प्रताप मचिये यांनी तक्रारदार यांना सांगितले कि, कारवाई टाळण्यासाठी किरण नागावकर यांना २ लाख रुपये द्यावे लागतील.
अशी दोन लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तडजोडीअंती दीड लाख रुपये देण्याचे ठरले होते. याप्रकरणी व्यक्तीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती.
मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला, या सापळ्यात तक्रारदार यांच्याकडून १ लाख रुपयांची लाच स्वीकारताना प्रताप मचिये यांना स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागा रंगेहाथ पकडले. तर लाचेची मागणी आणि लाचेची रक्कम स्वीकारण्यात किरण नागावकर यांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने किरण नागावकर यांनानी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले आहे.
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधिक्षक नवनाथ जगताप यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक स्वपन बिश्वास व त्यांच्या पथकाने केली आहे.