नागपूर : शूट अँड स्कूट अशी ही निती आहे. कुठलंही प्रकरण उकरून काढताना त्यावरून गोंधळ घालायचा. आम्ही देत असलेले उत्तर स्वीकारायचे नाही, असा प्रयत्न ठाकरे गटाचा दिसतोय. आतापर्यंत ते जे बॉम्ब म्हणत होते, ते लवंगी फटाके देखील नाहीत. आमच्याकडे देखील खूप बॉम्ब आहेत, ते कधी काढायचे ते ठरवू. यांचे लवंगी फटाके तरी पाहू द्या, असे वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केले.
नागपूर येथे सुरु असलेल्या विधिमंडळ अधिवेशनात विविध मुद्दे चर्चेत येत आहेत. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आमच्याकडे तर बरेच बॉम्ब आहेत. या बॉम्बच्या वातीही काढलेल्या आहेत. फक्त त्या वाती पेटवायचा अवकाश आहे. योग्य वेळी बॉम्ब फोडणार, असे म्हणताना राज्यातील वातावरण तापविण्याचा प्रयत्न केला होता.
काल विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर आरोपाच्या अनेक फैरी झाडल्या आहेत. आज सीमाप्रश्नावरील ठराव मांडण्यात येणार असल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यामुळे विधिमंडळातील आजचा दिवस देखील वादळी ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.