उरुळी कांचन, (पुणे) : येथील महात्मा गांधी विद्यालयात १३ वर्षांपूर्वी दहावीत शिक्षण घेणाऱ्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात पार पडला. १३ वर्षांनंतर पुन्हा एकत्रित जमलेले वर्गमित्र प्रथमच एकत्रितपणे भेटल्याने सर्वांच्याच चेहऱ्यावर आनंद व उत्साह दिसत होता. “तेच मित्रमैत्रिणी, तीच वर्गाची खोली, तेच बेंच, तीच सकाळची प्रार्थना, तेच दुपारचे झाडाखालचे जेवण, तीच दोस्ती दुनियादारीचे” याचे दर्शन पुन्हा १३ वर्षांनी अनुभूवायला मिळाले.
उरुळी कांचन (ता. हवेली) येथील महात्मा गांधी विद्यालयात २००८-०९ मध्ये दहावीत शिक्षण घेतलेले विद्यार्थी स्नेहमेळाव्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा एकत्र जमले होते. या वेळी प्रत्येकाने मनोगत व्यक्त केले. आपले शालेय जीवनातील अनुभव कथन केले. १३ वर्षांनंतर पुन्हा एकत्रित जमलेले वर्गमित्र भेटल्याने विद्यार्थी भारावून झाले होते.
अत्यंत कमी दिवसांमध्ये नियोजन समितीने या स्नेह मेळाव्याचे आयोजन करून देखील आपापल्या कामामध्ये व्यस्त असणारे २०० हुन अधिक माजी विद्यार्थी आपल्या शाळेतील जुन्या मित्र मंडळींना भेटायला आणि शाळा व शिक्षकांप्रती आदर व्यक्त करायला या स्नेह मेळाव्यात सहभागी झाले होते. यावेळी प्रत्येकाने मनोगत व्यक्त केले. आपले शालेय जीवनातील अनुभव कथन केले. पुन्हा एकत्रित जमलेले वर्गमित्र भेटल्याने विद्यार्थी भारावून गेले होते.
सोशल मीडियाच्या माध्यमातून हे सर्वत्र विखुरलेले विद्यार्थी एकत्र आले होते. शालेय जीवनातील काही गमतीदार आणि काही विनोदी आठवणींना उजाळा दिला. शाळेतील मस्ती, एकत्रितपणे केलेला अभ्यास, शिक्षकांचा विद्यार्थ्यांवरील वचक, शाळेतील क्रीडा स्पर्धा, शिक्षकांनी दिलेली शिक्षा, स्नेहसंमेलन आणि त्यातील सांस्कृतिक कार्यक्रमाची धूम अशा विविध विषयांवर माजी विद्यार्थ्यांनी गप्पा करून जुन्या आठवणींना उजाळा दिला.
या कार्यक्रमाचे आयोजन अक्षय बंटी कांचन, पै. शुभम काळे, सनी चौधरी, हितेश कांचन, आदित्य यादव, सागर पांगारे, वैभव कांचन, निलेश गाडेकर, अजिंक्य पवार, ओंकार क्षीरसागर, पूजा सणस, दिपाली कांचन, धनश्री कांचन, किरण लोंढे, आरती मेटे, रुकसार शेख यांनी केले होते.
शाळेचे आपण काहीतरी देणे लागतो या उद्देशाने या मुलांनी “स्नेहमेळाव्याच्या” माध्यमातून या १० वीच्या बॅचच्या मुलांकडून गडकिल्ले संवर्धन करणाऱ्या सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान या संस्थेला आर्थिक मदत केली. तसेच उरुळी कांचन येथील महात्मा गांधी विद्यालयात शिक्षण घेणाऱ्या पाच विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती गंभीर आहे.
अशा विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची जबाबदारी या बॅचने उचलली आहे. कार्यक्रमात सहभागी शिक्षकांचे आणि माजी विद्यार्थ्यांचे नियोजन समितीच्या विद्यार्थ्यांनी आभार मानून कार्यक्रमाची सांगता झाली.
दरम्यान, माजी विद्यार्थी व शिक्षकांचे स्वागत शुभम काळे व अक्षय कांचन यांनी केले. सूत्रसंचालन व प्रास्ताविक पूजा सणस व दिपाली कांचन यांनी केले तर आभार धनश्री कांचन यांनी मानले.