हनुमंत चिकणे
उरुळी कांचन, (पुणे) : आपल्या प्रिय जणांची अस्थी किंवा रक्षा विसर्जन करताना आपण अतिशय संवेदनशील असतो. त्यांच्या अस्थी विसर्जित करताना शक्यतो नदीपात्रात अथवा वाहत्या पाण्यात करतो. हे करण्यामागे आपल्याला सोडून गेलेल्या प्रियजनांच्या स्मृती कायम राहाव्यात यासाठी हा सारा प्रपंच असतो. मात्र, याला अपवाद ठरले आहे ते टिळेकरवाडी (ता. हवेली) येथील श्रीनाथ म्हस्कोबा कारखान्याचे वरिष्ठ अधीकारी सदाशिव टिळेकर यांचा परिवार यामुळे परिसरातील ग्रामस्थांकडून टिळेकर कुटुंबाचे कौतुक होत आहे.
सदाशिव बाबुराव टिळेकर यांच्या मातोश्री व हवेली तालुक्याच्या माजी पंचायत समीती सदस्या संगीता सदाशिव टिळेकर यांच्या सासुबाई चंद्रभागा बाबुराव टिळेकर यांचे नुकतेच वयाच्या ९५ व्या वर्षी नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले. या परिवाराने पारंपारिक रुढी परंपरा बाजूला ठेवत अस्थी पाण्यात सोडण्याऐवजी वृक्षारोपणासाठी वापरल्या आहेत.
या अस्थी व रक्षेचा वापर करून राहत्या घराच्या प्रांगणात आंबा व नारळाची सहा रोपे वडीलांच्या स्मृती कायम जागृत ठेवण्यासाठी लावण्याचा निर्णय घेतला व तेराव्याच्या दिवशी प्रत्यक्षात तीन आंब्याच्या व तीन नारळाच्या रोपांची लागवड करुन मनातील संकल्पनेला मूर्त स्वरूप देत आगळा वेगळा आदर्श समाजापुढे ठेवला आहे. त्यांनी शेतात कल्पवृक्ष म्हणुन ओळखल्या जाणाऱ्या नारळ वृक्षांची लागवड केली व पर्यावरण वाचवण्याचा अनोखा संदेश दिला.
यावेळी जेष्ठ नेते लक्ष्मण टिळेकर, राष्ट्रवादी कॉंग्रेस ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष सुभाष टिळेकर, राष्ट्रवादी किसान सेलचे अध्यक्ष रोहीदास टिळेकर, माजी सरपंच नीता टिळेकर, पोलीस पाटील विजय टिळेकर, ग्रामपंचायत सदस्या सुषमा टिळेकर, बबनराव टिळेकर,हर्षल टिळेकर हे उपस्थित होते.
दरम्यान, मनातील संकल्पनेला मूर्त स्वरूप देत आगळा वेगळा आदर्श समाजापुढे ठेवण्याचा सल्ला यशवंत सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष राजेंद्र तुळशीराम टिळेकर व श्रीदत्त सेवा ट्रस्ट चे अध्यक्ष संतोष दगडु टिळेकर यांनी दिला. त्यामुळे पुढील काही वर्षात एक मोठा वृक्ष नव्या पिढीला सावली आणि फळे देईल व त्यांच्या आठवणी पुढील पिढीला होत राहील.