मुंबई: प्रतिकूल स्थितीमुळे एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला दक्षिण कोकण, पश्चिम महाराष्ट्र, गुजरातमध्ये पूर्वमोसमी पाऊस जोर धरण्याची शक्यता आहे. सध्या राज्यात बहुतांश भागात तापमानाचा पारा वाढला आहे. मात्र, अनेक भागात पावसाळी वातावरण निर्माण होऊन तापमानात घटण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
आता साधारण 1 ते 4 एप्रिलदरम्यान पूर्वमोसमी पाऊस जोर धरण्याची शक्यता आहे. या कालावधीत कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये पूर्वमोसमी पाऊस हजेरी लावेल. मुंबईमध्येही हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळतील. पश्चिमी प्रकोपामुळे ही शक्यता वर्तविण्यात आली आहे.
दरम्यान, सध्या राज्यातील काही भागात ढगाळ वातावरण आणि अवकाळीच्या वातावरणामुळे तापमानात काहीशी घट झाली आहे. तर काही भागात पूर्वमोसमी पावसाने हजेरी लावली आहे. कोल्हापूर, सोलापूर, सांगली आणि गोवा या भागात मंगळवारी हलक्या सरी कोसळल्या.