सोलापूर : चपळगाव (ता. अक्कलकोट, जि.सोलापूर) येथील धानव्वा उटगे या आजीबाईंना वयाच्या १०६ व्या वर्षी दुधाचे दात परत आले. त्यामुळे त्यांच्या कुटुंबातील सर्व मंडळींनी आजीबाईंना पाळण्यात बसवून, झोका देऊन अन बारसे घालून आगळ्यावेगळ्या पद्धतीने आनंद साजरा केला.
धानव्वा या सर्वात वयोवृद्ध महिला आहेत. म्हातारपणात त्वचा सुकते आणि सर्व दात पडतात परंतु विशिष्ट वयानंतर धानवा यांना पुन्हा एकदा दुधाचे दात आल्याने घरातील लोकांनी चक्क पाळणा सजवला. त्यामध्ये आजीला टोपी आणि फुलांचा हार घालून लहान मुलाप्रमाणे जो बाळा जो जो रे म्हणत … चक्क बारशाचा कार्यक्रम केला. खापर पतवडं, पतवंड, नातवंडं, मुलं आणि सुना अशा आजींच्या कुटुंबातील तब्बल ८० जणांनी मिळून हा वाढदिवस साजरा केला.
दरम्यान, धानव्वा आजी मागील ४० वर्षांपासून एकदाच जेवतात. त्यांना शाकाहारी जेवण अधिक आवडते. त्याचबरोबर त्या रोज सकाळी योगा करतात. त्यामुळे त्यांची तब्येत उत्तम आहे, अशी माहिती त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी दिली.
आजकालच्या या फास्ट फुडच्या जीवनात तरुण-तरुणी मोठ्या प्रमाणात आपल्या आहाराकडे दुर्लक्ष करीत आहेत. तसेच झटपट बनणारे पदार्थ खाण्याकडे सर्वांचा ओढा असतो. अगदी लहान मुलांच्या आरोग्यावरही याचा परिणाम होतो. आपला आहार संतुलित असेल तर शरीरही सुदृढ बनते.