पुणे : पूर्वीच्या वादातून झालेली भांडणे सोडवताना मध्यस्थी केल्याप्रकरणी तिघांनी एकाच्या घरात शिरुन तरुणावर कोयत्याने वार करीत कुटुंबियांनाही बेदम मारहान केल्याची घटना घडली. येरवडा परिसरातील कतारवाडी परिसरात शुक्रवारी (ता. २३) दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास हि घटना घडली आहे.
गणेश भारतीनाथ सदभैय्या, नितेश सुनिल सदभैय्या आणि शुभम जयवंत बावरी (सर्व रा. कतारवाडी, येरवडा) अशी मारहाण केलेल्या तीन आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी विशाल बाबु सदभैय्या (वय ३५, रा. यशवंतनगर, कतारवाडी) यांनी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी तिघांवर खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विशाल सदभैय्या हे खराडी येथील एका कंपनीत सिनीअर एक्सीकेटीव्ह म्हणून नोकरी करत आहेत. त्यांच्या घराशेजारीच भावकीतील नितेश सदभैय्या, गणेश सदभैय्या राहतात. मंगळवारी (ता. २०) रात्री ९ वाजण्याच्या सुमारास कतारवाडी चौकात मित्राबरोबर गप्पा मारत होते.
त्यावेळी त्यांच्या भावकीतील गणेश सदभैय्या याचे वडिल भारतीनाथ सदभैय्या याचे महेंद्र बावरी याच्यासोबत पूर्वीच्या वादातून शाब्दीक वादावादी करु लागले. त्यावेळी विशाल यांनी दोघांना समजावत त्यांच्यातील भांडण मिटवले.
मात्र, भारतीनाथ याला फिर्यादीने केलेली मध्यस्थी आवडली नाही. विशाल हे शुक्रवारी दुपारी बारा वाजता जय महाराष्ट्र चौकात बोलत थांबले असताना गणेश तेथे आला व तू परवा माझ्या वडिलांचे भांडण का सोडवले़ तुला कुणी शहाणपणा करायला सांगितला होता़ थांब तुझा कायमचा बंदोबस्त करतो,असे म्हणून तो तिथून निघून गेला.
विशाल हा घरी जात असताना गणेश, नितेश, शुभम बावरी धावत आले. त्यांच्याकडे लोखंडी रॉड कोयते होते. त्यांना पाहून फिर्यादी घरात गेले. परंतु गडबडीत दरवाजाची कडी लागली नाही. तेव्हा त्यांनी दरवाजावर लाथ मारुन फिर्यादी यांना बाहेर खेचले. तुझ्यामुळे माझ्या बापाला परवा खाली मान घालावी लागली, आज आम्ही तुझा गेम करणारच, असे गणेश याने म्हणत हातातील रॉडने फिर्यादीला मारहाण करण्यास सुरुवात केली.
नितेश याने लोखंडी पंच डोक्यात मारला. फिर्यादी हे जोर जोरात वाचवा वाचवा असे ओरडू लागले. तेव्हा त्यांची आई बाहेर आली. ती व फिर्यादीची पत्नी सोडवायला आली असताना नितेश याने ये म्हतारे तु जरमध्ये आलीस तर तुला पण खल्लास करीन असे म्हणत आईच्या कानशीलात लावली. पत्नीलाही शुभम बावरी व गणेश याने हाताने मारहाण केली.
दरम्यान, नितेश व शुभम यांनी कोयता हवेत फिरवत जर याला सोडवायला कुणीमध्ये आला तर याद राखा़ आम्ही इथले भाई आहोत, जर कुणी मध्ये आला तर खल्लास करुन टाकीन, आमच कुणी काही वाकड करु शकत नाही, असे म्हणाले. तेव्हा शेजारी राहणार्यांनी घाबरुन दारे खिडक्या बंद केल्या.
तेव्हा फिर्यादी यांचा भाऊ सोमनाथ रामनाथ व राहुल बावरी हे धावत असल्याचे पाहून तिघेही आज आमच्या तावडीतून वाचलास,पण उद्या कोण वाचवेल, आम्ही उद्या तुला ठार करु असे म्हणून तेथून निघून गेले.पोलिसांनी खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला असून विश्रांतवाडी पोलीस तपास करीत आहेत.