पुणे : पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील दुकाने फोडून मिळालेल्या पैशांतून मुंबईत जाऊन महागड्या हॉटेलमध्ये मौजमजा करणाऱ्या दोन अट्टल चोरट्यांना गुन्हे शाखा युनिट क्रमांक ४ च्या पोलिसांनी विश्रांतवाडीतून अटक केली आहे. चोरट्यांकडून दुचाकी आणि रोकड असा दीड लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच ११ गुन्ह्यांची उकल झाली आहे.
विकास उर्फ जंगल्या दिलीप कांबळे (वय-२७, रा. पवार वस्ती, कुदळवाडी, चिखली) आणि अजय चेलाराम राम (वय २०, रा. बौद्धनगर, पिंपरी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विश्रांतवाडी भागात गुन्हे शाखा युनिट चारचे पथक गस्त घालत असताना, पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील दुकाने फोडून धुमाकूळ घालणारा आरोपी जंगल्या कांबळे आणि त्याचा साथीदार आळंदी रस्त्यावरील बसथांब्यावर थांबला असल्याची माहिती एका खबऱ्यामार्फत पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलिसांनी सापळा रचून दोन्ही आरोपींना मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले.
दरम्यान, जंगल्या कांबळे आणि त्याचा साथीदार अजय राम दोघे सराईत चोरटे आहेत. दुकाने फोडून मिळालेल्या पैशांतून दोघे जण मुंबईत जाऊन महागड्या हॉटेलमध्ये वास्तव्य करायचे. मुंबईत मौजमजा करायचे, असे पोलिसांनी सांगितले.
दोघांनी फरासखाना, विश्रामबाग, चतु:शृंगी, वाकड, चिंचवड, भोसरी एमआयडीसी, चाकण, विश्रांतवाडी आणि विमानतळ पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील ११ दुकाने फोडल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
ही कारवाई पोलीस निरीक्षक गणेश माने यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक विकास जाधव, उपनिरीक्षक जयदीप पाटील, महेंद्र पवार, अजय गायकवाड, प्रवीण भालचिम, सारस साळवी, विठ्ठल वाव्हळ आणि मनोज सांगळे यांच्या पथकाने केली आहे.