पुणे : बेल्हे येथील माजी सभापती बोरचटे यांच्या घरातून २८ लाख ५० हजार लुटलेल्या आंतरराज्य टोळीतील ६ जणांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण (ग्रामीण) शाखा व आळेफाटा पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत.
इर्शाद नईम शेख (वय – २८), नईम चांद शेख, वय ५२, रा. दोघेही रो. हाऊस नं. ७, संजेरी बो-हाडेमळा, पंचक जेल रोड, नाशिक रोड, नाशिक), मोहम्मद हनीफ अल्ला बंदखान (वय – ६२, रा. १०८, पटेलनगर, खाजराणा इंदोर), शुभम रामेश्वर मालवीय, (वय – २४, रा. गादेशहा पिपालिया, ता. जि. देवास), रहमान फजल शेख, वय ३४, रा. फलॅट नं. १, पंचम अॅव्हेन्यू, जेल रोड, राजेश्वरी मंगल कार्यालय, नाशिक), लखन बाबुलाल कुंडलिया (वय – ३०, रा. देवास रसलपूर, ता. जि. देवास) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. सदर आरोपींना मध्यप्रदेश येथून ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आळेफाटा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बेल्हे (ता. जुन्नर) येथे सोमवारी (ता. १९) मध्यरात्री सदाशिव रामभाऊ बोरचटे यांच्या राहत्या घरामध्ये ६ अनोळखी दरोडेखोरांनी घराचे कम्पाउंडची व हॉलच्या भिंतीची जाळी कट करून घरात प्रवेश केला. नातेवाईकांना कोयता व पिस्टलचा धाक दाखवून घरातील व अंगावरील सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा २८ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता. याबाबत बोरचटे यांनी आळेफाटा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार दरोड्याचा गुन्हा दाखल केला होता.
सदरचा गुन्हा हा गंभीर स्वरूपाचा असल्याने जिल्हा पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी स्थानिक गुन्हे शाखा व आळेफाटा पोलिसांची वेगवेगळी पथके तयार करून त्यांना गुन्हा उघडकीस आणण्याच्या सुचना दिलेल्या होत्या. त्यानुसार सदर घटनेचा पोलीस तपास करीत असताना तांत्रिक विश्लेषण व गुन्हेगारांची माहिती प्राप्त केली व खबऱ्याकडून माहिती घेऊन नाशिक व मध्यप्रदेश येथे एकाचवेळी छापेमारी करून वासिंद ठाणे ग्रामीण येथून बाप-लेक इर्शाद नईम शेख व नईम चांद शेख, या दोघांना ताब्यात घेतले.
दरम्यान, वरील आणखी चार आरोपींना मध्यप्रदेश येथून ताब्यात घेतले. त्यांचाकडे अधिक चौकशी केली असता सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली. तसेच आंतरराज्य टोळीतील सदस्यांवर यापुर्वीचे दरोडा, जबरी चोरी, चोरी, घरफोडी असे एकुण २० गुन्हे दाखल आहेत. तसेच याच टोळीने दिंडोरी येथे एका कंपनीत २ गुन्हे केले असल्याची कबुली दिली आहे. आरोपींनी गुन्हयातील दरोडा टाकून चोरलेले सोन्याची विल्हेवाट लावल्याचे निष्पन्न झाले आहे तर आरोपींनी गुन्हा करताना वापरलेली स्विफ्ट कार व स्विफ्ट डिझायर अशा दोन गाडया जप्त करण्यात आलेल्या आहेत.
सदरची कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, आळेफाटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन काळे, नेताजी गंधारे, पोलीस उपनिरीक्षक गणेश जगदाळे, सहायक पोलीस उपनिरीक्षक तुषार पंदारे, पोलीस हवालदार दिपक साबळे, राजू मोमीन, विक्रमसिंह तापकीर, जनार्दन शेळके, सचिन घाडगे, योगेश नागरगोजे, चंद्रकांत जाधव, संदिप वारे, अक्षय नवले, निलेश सुपेकर, अक्षय सुपे, मुकुंद कदम, प्रमोद नवले, आळेफाटा पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक बडगुजर, पोलीस हवालदार गायकवाड, पारखी, मालुंजे, ढोबळे यांनी केली आहे.