पुणे : पुणे शहरातील डेक्कन येथील वैकुंठ स्मशानभूमीत शुक्रवारी (ता. २३) मध्यरात्री अडीचच्या सुमारास दोन तृतीयपंथी चितेजवळ जादूटोणा सारखे अघोरी कृत्य करतानाची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी डेक्कन पोलिसांनी दोन तृतीयपंथींना बेड्या ठोकल्या आहेत.
लक्ष्मी निबाजी शिंदे आणि मनोज अशोक धुमाळ अशी अटक करण्यात आलेल्या तृतीयपंथींची नावी आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, शुक्रवारी (ता.२३) वैकुंठ स्मशानभूमीत रात्री १ वाजण्याच्या सुमारास एका मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर काही तासाने शिंदे आणि धुमाळ हे चितेजवळ आले. दोघांनी त्यांच्यासोबत आणलेले काळ्या रंगाच्या बाहुल्या, काही लोकांचे फोटो, लिंबू, सूया आणि हळदी कुंकू हे साहित्य घेऊन काही तरी अघोरी कृत्य करत होते.
दरम्यान, ही घटना स्मशानभूमीतील एका कर्मचाऱ्याने पाहिली आणि त्याने पोलिसांना तत्काळ याची माहिती दिली. त्यानंतर घटनास्थळी पोलीस दाखल झाले आणि त्यांनी या दोघांनाही रंगेहाथ पकडले.
दोन्ही आरोपींविरोधात नरबळी व इतर अमानुष अघोरी, दुष्कर्मी प्रथा आणि काळा जादू अधिनियम २०१३ कलम ३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.