भोर : वेळू (ता. भोर) ग्रामपंचायत हद्दीतील श्रीराम पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या कामगारांना अज्ञात पाच चोरट्यांनी कोयत्याने मारहाण करून २२ हजार रुपयांची रोख रक्कम लुटली आहे. हि घटना गुरुवारी (ता. २३) संध्याकाळी साडेआकरा वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
याप्रकरणी योगेश विनायक हिंगे (वय – ३७, रा. हिंगे वाटर, टापरेवाडी, ता. भोर जि. पुणे) यांनी अज्ञात ५ आरोपींविरोधात भोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वेळू ग्रामपंचायत हद्दीत तुषार रामचंद्र जगताप यांच्या मालकीचा श्रीराम पेट्रोल पंप आहे. गुरुवारी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास पाच अज्ञात इसम हे हातामध्ये दोन ते अडीच फूट लांबीचे धारदार कोयते घेऊन दोन कळ्या रंगाच्या मोटरसायकल वरून आले होते. त्यांनी सिक्युरिटी गार्ड भरत परिहार यास हाताला पकडून हिंगे काम करीत असलेल्या कार्यालयात आणून कॅश द्या कॅश द्या असे ओरडत व शिवीगाळ करत आरोपींनी हिंगे व आणखी तीन कामगारांना व सुरक्षारक्षकाला कोयत्याने मारहाण केली.
दरम्यान, सर्वांना गंभीर व किरकोळ दुखापत करून जवळ असलेली २१ हजार ८०० रुपयांची रोख रक्कम दरोडा टाकून पळवून घेऊन गेले. याबाबत भोर पोलीस ठाण्यात अज्ञात पाच आरोपींविरुद्ध फिर्याद दिली आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक जोशी करीत आहेत.