विशाल कदम
लोणी काळभोर (पुणे) : पुणे-सोलापूर महामार्गावरील कुंजीरवाडी (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील धनश्री लॉन्स, मंगल कार्यालयासमोर लक्झरी बसमध्ये शिरून चालकाच्या मानेवर, हातावर कोयत्याने वार करून खून करण्याचा प्रयत्न करणाऱ्या ३ आरोपींना गुन्हे शाखा युनिट क्र ६ च्या पोलिसांनी हडपसर येथील शहिद हेमंत करकरे, उद्याना शेजारी असलेल्या मोकळ्या हॉलीबॉलच्या मैदानातून अटक केली आहे.
रोहित अरुण पवार (वय २०, रा. शिवमंदिर जवळ, गोधळे नगर हडपसर, पुणे), आदित्य संजय लोखंडे (वय २० रा. गणपती मंदिराजवळ, गोंधळेनगर हडपसर, पुणे) व एक विधी संघर्षीत बालक अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लक्झरी बसमध्ये शिरून ४ ते ५ अनोळखी इसमांनी बस चालकाच्या मानेवर हातावर कोयत्याने वार करून जखमी केल्याची घटना कुंजीरवाडी (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील धनश्री लॉन्स, मंगल कार्यालयासमोर ९ ऑक्टोंबर २०२२ रोजी घडली होती. याप्रकरणी लोणीकाळभोर पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हयातील जखमीस अनोळखी आरोपींचा उद्देश माहीत नसल्याने तसेच आसपास सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याने या गुन्ह्यातील आरोपी निष्पन्न करणे आव्हानात्मक होते. सदरचा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी गुन्हे शाखा युनिट क्र ६ चे पथक आरोपींच्या मागावर होते. पोलीस अंमलदार नितीन मुंढे हे हडपसर हद्दीमध्ये पेट्रोलिंग करित असताना, कुंजीरवाडी येथील खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी हे शहिद हेमंत करकरे, उद्यान हडपसर शेजारी असलेल्या मोकळ्या हॉलीबॉलच्या मैदानात बसलेले आहेत. अशी माहिती एका खबऱ्यामार्फत मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पथकाने सदर ठिकाणी गेले. तेव्हा आरोपींना पोलीस आल्याची चाहूल लागताच आरोपींनी पळ काढला. पोलिसांनी आरोपींचा पाठलाग करून मोठ्या शिताफीने अटक केली.
दरम्यान, पोलिसांनी वरील तिन्ही आरोपींना ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता, आरोपींचा साथीदार सुरज शिरसाठ हा ट्रॅव्हल्सने पुण्याकडे येत असताना ट्रॅव्हल्स चालकासोबत सिटवर पाय ठेवण्यावरून भांडण झाले. त्यावेळी सुरज याने आम्हाला फोन करुन सांगितले, त्यामुळे आम्ही तिघेजण तसेच आमचे तीन मित्र असे मिळून सहा जणांनी लक्झरी बसचा शोध घेतला. तेव्हा लक्झरी अडवून बसचालकाच्या हातावर व मानेवर कोयत्याने वार केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे. आरोपींना पुढील कारवाईसाठी लोणीकाळभोर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. आणि पोलीस इतर आरोपींचा शोध घेत आहेत.
सदरची उल्लेखनीय कामगिरी गुन्हे शाखा युनिट ६ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रजनिश निर्मल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुरेश जायभाय, पोलीस उपनिरीक्षक भैरवनाथ शेळके, अंमलदार मच्छिंद्र बाळके विठ्ठल खेडकर, कानिफनाथ कारखेले, रमेश मेमाणे, बाळासाहेब सकटे, नितीन मुंढे, प्रतिक लाहिगुडे, ऋषिकेश ताकवणे ऋषिकेश व्यवहारे, सचिन पवार, ऋषिकेश टिळेकर, नितीन धाडगे, अशफाक मुलाणी, ज्योती काळे आणि सुहास तांबेकर यांच्या पथकाने केली आहे.