पुणे : येथील कसबा मतदार संघाच्या आमदार मुक्ता टिळक (वय ५७) यांचे काल दुपारी ३.३० वाजता कर्करोगामुळे निधन झाले. आज त्यांच्यावर दुपारी १२ च्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात येणार असून सध्या आज सकाळी ९ ते ११ पर्यंत त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी केसरीवाडा येथे ठेवण्यात आले आहे. स्व. मुक्ता टिळक यांचे अंत्यदर्शनासाठी जनसमुदाय मोठ्या प्रमाणात हजेरी लावत आहेत.
स्व. मुक्ता टिळक यांच्या अंत्यसंस्कारांसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, कोथरूडचे आमदार तथा उच्च शिक्षण व तंत्रज्ञान मंत्री चंद्रकांत पाटील हे देखील उपस्थित राहण्याची शक्यता आहे. त्याबरोबरीने पुण्यातील भाजपाचे सर्व आमदार तथा विविध पदाधिकारी देखील वैकुंठ स्मशानभूमी येथे उपस्थित राहणार आहेत.
स्व. मुक्ता टिळक यांच्या अंत्ययात्रेला सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास सुरुवात होणार असून ही अंत्ययात्रा केळकर रस्ता, शास्त्री रस्ता मागे जाणार आहे, त्यासाठी वाहतूक व्यवस्थेत आवश्यकतेनुसार बदल करण्यात येणार असल्याचे वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त चंद्रकांत सांगळे यांनी अशी माहिती दिली आहे. वाहनचालकांनी टिळक रस्ता किंवा लक्ष्मी रस्त्याचा वापर करावा असे आवाहन पुणे वहातुक शाखेच्या वतीने करण्यात आले आहे.
आमदार मुक्ता टिळक यांनी सन २००२, २००७, २०१२ व २०१७ साली भारतीय जनता पक्षाचे प्रतिनिधी म्हणून पुणे महानगरपालिकेत काम पाहिले. भाजपा महिला आघाडीच्या अध्यक्षा, स्थायी समिती सदस्य व भाजपाच्या उपाध्यक्षा म्हणून त्यांनी कामकाज पहिले. त्यांनी अडीच वर्षे महापौर पद देखील सांभाळले होते. सन २०१९ मध्ये पक्षाने कसबा मतदारसंघातून उमेदवारी दिली होती व त्या आमदार झाल्या.