पुणे : महाविकास आघाडी सरकारच्या काळात कोरोनाची परिस्थिती चांगल्याप्रकारे हाताळली होती. ‘कोराना’च्या नवीन व्हेरिएंटचा प्रसार होऊ नये म्हणून सर्वांनी एकत्र येऊन काळजी घेण्याची आवश्यकता असून राज्य सरकारने ‘कोरोना’ चा विषय गांभीर्याने घ्यावा, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी गुरुवार (ता. २२) सभागृहात केली आहे.
अजित पवार पुढे म्हणाले की, कोरोनाच्या काळात मार्च महिन्यात दुबईतून आलेल्या जोडप्यामुळे महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग वाढला. चीन, जपान, कोरिया, ब्राझिल या देशांत कोरोनाचा नवीन व्हेरिएंट सापडत आहे आणि कोविडची साथ पुन्हा सुरू झाली आहे. चीनमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. बेड शिल्लक नाहीत म्हणून तिथे कारमध्ये रुग्णांना उपचार घेण्याची वेळ आली आहे.
या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या आरोग्य सचिवांनी काल नव्या व्हेरिएंटविषयी तपास आणि काळजी घेण्याचे आवाहन सर्व राज्यांना केले आहे. त्यात आपलेही राज्य असेल. त्यामुळे ‘कोरोना’चे गांभीर्य ओळखून राज्य सरकारने तातडीने पाऊले उचलण्याची मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली. याला सकारात्मक प्रतिसाद देत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारच्या माध्यमातून तातडीने टास्क फोर्स उभारणार असल्याची माहिती दिली.