पुणे : वीजग्राहकांनी छतावरील सौर ऊर्जा प्रकल्पाची उभारणी केल्यानंतर तो नेटमीटरींगद्वारे कार्यान्वित करण्यासाठी महावितरणच्या अभियंता व कर्मचाऱ्यांनी प्राधान्य देत आणखी गती वाढवावी असे निर्देश पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार यांनी बुधवारी (ता. २१) दिले आहे.
अभियंता व तांत्रिक कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणासाठी गणेशखिंड येथील विश्रामगृहाच्या छतावर सौर ऊर्जा प्रकल्पाची ग्रीनर्जी सस्टेनेबल्स एलएलपीचे समीर गांधी व एनर्जिका सोल्यूशन्सचे स्वप्निल बाथे यांच्या सहकार्याने उभारणी करण्यात आली. या प्रकल्पाचे उद्घाटक म्हणून मुख्य अभियंता श्री. पवार बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अधीक्षक अभियंता श्री. प्रकाश राऊत व श्री. सतीश राजदीप, महाराष्ट्र सोलर मॅन्युफॅक्चरर्स असोशिएशनचे (मास्मा) संचालक समीर गांधी, राजेश मुथा, रवींद्र कुलकर्णी यांची उपस्थिती होती.
मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार म्हणाले, की ग्रीन एनर्जीला प्राधान्य देत वीजग्राहकांकडून प्रामुख्याने छतावरील सौर ऊर्जा प्रकल्पांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र नेटमीटरिंगच्या माध्यमातून हे सौर प्रकल्प महावितरणच्या ग्रीडसोबत जोडण्यासाठी अभियंता व कर्मचाऱ्यांची कार्यतत्परता महत्वाची आहे.
त्यासाठी कार्यान्वित झालेल्या या सौर ऊर्जा प्रकल्प व नेटमीटरिंगद्वारे अभियंता व तांत्रिक कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष माहिती व प्रशिक्षण दिले जाणार आहे. सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित करण्याची तांत्रिक व प्रशासकीय गती आणखी वाढवा आणि संबंधित ग्राहकांना तत्पर सेवा द्या असे निर्देश यावेळी मुख्य अभियंता श्री. पवार यांनी दिले.
‘मास्मा’चे संचालक श्री. समीर गांधी म्हणाले, की पर्यावरणाचे प्रश्न निर्माण होत असल्याने सौर ऊर्जेचे महत्व यापुढे अधिक वाढत आहे. सौर ऊर्जा प्रकल्पांबाबत इतर राज्यांच्या तुलनेत महावितरणचे काम चांगले आहे. महावितरण व ‘मास्मा’ यांच्या सहकार्याने सौर ऊर्जा प्रकल्पांना आणखी गती मिळेल व ग्राहकांना तत्पर सेवा मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. अधीक्षक अभियंता श्री. प्रकाश राऊत यांनीही यावेळी तांत्रिक मार्गदर्शन केले.
महावितरणच्या लघु प्रशिक्षण केंद्राचे समन्वयक डॉ. संतोष पटनी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले व आभार मानले. यावेळी महावितरणचे अभियंता, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यानंतर महावितरणच्या शिवाजीनगर विभागातील अभियंता व तांत्रिक कर्मचाऱ्यांसाठी सौर ऊर्जा प्रकल्पाच्या प्रशिक्षण व अभ्यास वर्गाला सुरवात करण्यात आली.
पुणे परिमंडलातील सौर प्रकल्पाशी संबंधित सर्व विभागातील अभियंते व तांत्रिक कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.