पुणे : फुरसुंगी आणि उरुळी देवाची या गावांसाठी नगरपालिका करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मात्र, कचरा डेपोमुळे फुरसुंगी व देवाची उरुळी येथील भूगर्भातील पाण्याचे स्रोत दूषित झाले आहेत. त्यामुळे या गावांसाठी टँकरने पाणी पुरवठा करण्यात येतो.
या दोन गावांसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून पाणी पुरवठा योजना यापूर्वीच मंजूर करण्यात आली आहे. मात्र, या योजनेचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. हे काम पूर्ण होईपर्यंत जलसंपदा विभागाकडून या गावांना पाणी दिले जाणार आहे.
फुरसुंगी आणि उरुळी देवाची या गावांमध्ये महापालिकेकडून सध्या टँकरने पाणीपुरवठा करण्यात येतो. त्यासाठी खडकवासला कालव्यात पाणी सोडले जाणार आहे. याबाबत खडकवासला पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता विजय पाटील म्हणाले, “फुरसुंगी आणि उरुळी देवाची ही दोन गावे महापालिकेत समाविष्ट करण्यात आल्यानंतर जलवाहिन्या टाकण्यात येणार असल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आले होते.
लष्कर जलकेंद्रातून फुरसुंगीला पाणी देण्याचे प्रस्तावित करण्यात आल्याचेही जलसंपदा विभागाला सांगण्यात आले होते. मात्र, आता या गावांची नगरपालिका होणार आहे. या गावांसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची योजना प्रस्तावित आहे. या योजनेचे काम पूर्ण होईपर्यंत जलसंपदा विभागाला या गावांसाठी कालव्यात पाणी सोडावे लागणार आहे.”