सासवड (ता. पुरंदर) : सासवड येथील जोतिचंद भाईचंद ज्वेलर्सच्या दुकानातील ५० लाखाच्या दागिन्यांवर कर्मचाऱ्यांनी डल्ला मारल्याची धक्कादायक घटना नुकतीच उघडकीस आली आहे. याप्रकरणी शाखा व्यवस्थापक, रोखपालासह तिघांवर सासवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
स्वप्निल श्रेणीक शहा (रा. लॅर्बन्म पार्क, प्लॅट नं. २०१, मगरपट्टा सिटी, हडपसर) यांनी सासवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार संदीप तानाजी बिचकुले (व्यवस्थापक, हडपसर), निखिल पांडुरंग भापकर (रोखपाल, रा. सोमेश्वर, बारामती) आणि सागर बाबूराव हिरप (सेल्समन, सासवड, ता. पुरंदर) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सासवड येथील पीएमपीएमएल बस थांब्याजवळील जोतिचंद भाईचंद ज्वेलर्सची शाखा नं. १ आहे. सासवड शाखेत संदीप बिचकुले हे व्यवस्थापक आहे. निखिल भापकर हा दुकानातील पैशांचे सर्व व्यवहार पाहतो. तर सागर हिरप याच्याकडे सोन्याचे गंठण विभाग असतो. बिचकुले हे दररोज सायंकाळी दुकानातील दिवसभराच्या पैशांची व स्टॉकची माहिती हडपसर येथील मुख्य शाखेला देत असतो.
दरम्यान, या शाखेतील सोने, चांदी व रोख रक्कमेची नियमित तपासणी चालू असते. हडपसर येथील मुख्य शाखेतील अलका शिंदे (खरेदी व्यवस्थापक) त्यांच्या टीमसह सासवड शाखेत १५ नोव्हेंबर २०२२ रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास आल्या होत्या. त्यांनी दुकानातील स्टॉक तपासला. तेव्हा त्यांना ५१२ ग्रॅम सोन्याचे दागिन्यांमध्ये तफावत आढळून आली. त्यानंतर मुख्य व्यवस्थापक राजेंद्र गोगरे (मुख्य व्यवस्थापक) यांनी १८ नोव्हेंबरला सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास सासवड शाखेत येऊन चौकशी केली.
त्यानंतर अलका शिंदे (खरेदी व्यवस्थापक) व त्यांच्या सहकाऱ्यांनी सासवड शाखेला पुन्हा भेट दिली. आणि संपूर्ण सोन्याचा स्टॉकची पुन्हा तपासणी केली. त्यावेळी त्यांना ११७८.६१० ग्रॅम सोने कमी दिसून आले. त्यानंतर वरील तिघांना हडपसर शाखेत बोलाविण्यात आले. त्या वेळी संदीप बिचकुले याने सोने ग्राहकांना दिले असून त्याची बिले झालेली नाहीत आणि हा स्टॉक परत आणून देण्याची जबाबदारी सर्वांनी घेतली.
दरम्यान, निखिल भापकर याने बांगड्या, गंठण, गोठ आणि अंगठी असे १५४.९८० ग्रॅम नेलेल्या सोन्याच्या वस्तू परत आणून दिल्या. हा प्रकार संदीप बिचकुले यांच्या सांगण्यावरून आला आहे. असे भापकर यांनी सांगितले. तर सागर हिरप याने ६०० ग्रॅम सोने बँकेमध्ये गहाण ठेवून त्यावर २२ लाख रुपये कर्ज घेतल्याचे सांगितले. तसेच तिघांनीही स्वहस्ताक्षरात कबुली जबाब लिहून दिले आहेत. मात्र तिघांनीही ९०५ ग्रॅम सोने (किंमत रुपये ५० लाख) अद्याप आणून दिले नाहीत.
याप्रकरणी स्वप्निल शहा यांनी सासवड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानंतर तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सासवड पोलीस करीत आहेत.