बारामती : मद्यधुंद अवस्थेतील चार ते पाच जणांची हातात कोयता घेऊन पाचहून अधिक हॉटेल फोडल्याची घटना बारामती शहरात शनिवारी (ता. १७) संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या हल्ल्यात दोन जन गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेनंतर शहरात नागरिकांमध्येही भीतीचे वातावरण तयार झाले आहे.
संशयित आरोपी शामवेल जाधव, विशाल माने(दोघे रा. वसंतनगर, बारामती), प्रथमेश मोरे (रा. प्रगतीनगर), यश मोहिते व चैतन्य कांबळे या पाच जणांवर दोन वेगवेगळे दरोड्याचा व खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला असल्याची माहिती पोलिस निरीक्षक सुनील महाडिक यांनी दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, बारामती एमआयडीसी परिसरातील रेल्वे गेटनजीक या टोळक्याने एकाचा मोबाईल हिसकावत एका दुकानाची मोडतोड केली. तेथून पाटस रस्त्यावरील सराफ पेट्रोलपंपावर पेट्रोल टाकून पैसे मागणा-या कर्मचा-यावर कोयत्याने हल्ला केला, मात्र त्याने तो चुकविल्याने पेट्रोल भरण्यास आलेल्या एका व्यक्तीला कोयता लागला.
त्यानंतर तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयासमोरील दुकान व हॉटेलमध्ये हे युवक घुसले. तेथे भांडणे करीत या युवकांनी हॉटेल आणि दुचाकी आणि चारचाकी वाहनांची मोडतोड केली. चारचाकी वाहनांच्या काचा फोडल्या, या शिवाय एकावर कोयत्याने वार केले.
त्यानंतर दुचाकीवरुन हातात कोयते घेऊन या युवकांनी शहरात दहशत माजविण्याचा प्रयत्न केला. काही दुकानांच्या सीसीटीव्हीत ही दृश्य कैद झाली आहेत.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक सुनील महाडीक व त्यांच्या सहकाऱ्यांनी तातडीने तपासाची चक्रे हलवून दोन युवकांना ताब्यात घेतले आहे. आरोपींनी कुठे कुठे काय नुकसान केलेले आहे, याची माहिती पोलिस घेत आहेत.