पुणे : पुण्यावरून सोलापूरच्या दिशेने निघालेल्या भावनगर-काकीनाडा एक्स्प्रे्समध्ये गुरुवारी (ता. १५) रात्री आठ वाजण्याच्या सुमारास मलिकपेठ (ता. मोहोळ) येथे अज्ञात चोरट्यांनी दरोडा टाकत सोने-चांदीचे दागिने व रोख रक्कम लुटल्याची घटना घडली आहे.
गौसिया बेगम (वय ६० वर्ष) यांच्या गळ्यातील दोन तोळे सोन्याचे दागिने आणि ७ हजार रुपयांची रोकड, श्रीमती राधा (वय ४२ वर्ष) या महिला प्रवाशाच्या गळ्यातील अडीच तोळे सोन्याचे दागिने, श्रीमती गीता यांच्या गळ्यातील चार तोळे सोन्याचे दागिने आणि ७ हजार ५०० रुपयांची रोख अशी रोख रक्कम व दागिने लुटलेल्या महिलांची नावे आहेत. याबाबत प्रवाशांनी टीसी खुशीराम मीना यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भावनगर-काकीनाडा एक्स्प्रेस हि पुण्यावरून सोलापूरच्या दिशेने निघाली होती. दौंडवरून थेट सोलापूरला थांबा असल्याने अनेक प्रवासी आराम करत होते. यावेळी मोहोळ तालुक्यातील मलिकपेठ येथे गाडीचा वेग कमी झाला होता. यावेळी अज्ञात चोरटे हे एक्स्प्रेसमधील एस-६,एस-७ या डब्यात घुसले. झोपी गेलेल्या प्रवाशांना दमदाटी करत त्यांच्या अंगावरील दागिने ओरबाडून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. यामध्ये वरील प्रवाश्यांचे दागिने ओरबाडून व रोख रक्कम घेऊन निघून गेले.
दरम्यान, या घटनेमुळे प्रवाशांत भीतीचे वातावरण पसरलं आहे. दरोडेखोरांनी ट्रेक डाऊन केल्यामुळे एक्स्प्रेसचा वेग कमी झाला, अशीही माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर प्रवाशांनी ताबडतोब टीटी खुशीराम मीना यांच्याकडे तक्रार दाखल केली असून सोलापूर स्थानकावर आल्यावर आरपीएफ आणि लोहमार्ग पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली आहे. लोहमार्ग पोलीस आणि आरपीएफ पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.