पुणे : पुणे महानगरपालिकेतून फुरसुंगी आणि उरूळीदेवाची ही दोन गावे वगळण्याचा निर्णय मुख्यमंत्री शिंदे यांनी घेतल्यानंतर या भागातील महापालिका निवडणुकीचे सगळीच गणिते बदलली आहेत. सुरवातीला आरक्षण, प्रभाग रचना जाहीर होत नसल्याने आजी-माजी नगरसेवकांसह ‘इच्छुक’ उमेदवारांना तयारी करण्यात अडचणी येत होत्या.
मात्र, आता दोन गावेच वगळण्यात येत असल्याने संपूर्ण राजकारणाच बदलणार असून, नव्या नगरपालिकेसंदर्भातील प्रशासकीय निर्णयांवरच येथील जुन्या-जाणत्यांचे राजकारण अवलंबून असणार आहे. या नवी नगरपालिकेच्या निर्णयामुळे ‘प्रथम नगरसेवक’ म्हणून येणाऱ्यांचे स्वप्नही धुळीस मिळणार आहे.
पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी मुख्य राजकीय पक्षांसह छोट्या-मोठ्या पक्षांसह अपक्षांनीही तयारी केलेली असताना निवडणूक प्रक्रिया आरक्षण आणि प्रभाग रचनेच्या निर्णयातच अडकली होती.
तसेच निवडणूक लढवायचीच, यावर ठाम असलेल्यांनी आजी-माजींसह इच्छूक उमेदवारांनीही पक्षीय वरीष्ठांकडे पाठपुरावा सुरू केला होता. अनेकांनी गणेशोत्सवापासून दिवाळीपर्यंत तयारी करीत मतदारांना आकर्षित करण्यासाठी फराळ, स्नेहमेळावा असे विविध कार्यक्रम घेताना हात मोकळा सोडला होता.
परंतु, गेल्या महिन्यांपासून निवडणुकीच्या तारखा सातत्याने पुढे जात आहेत तर प्रभागांबाबतही निर्णय होत नसल्याने उमेदवार पुरते वैतागले आहेत.
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून फुरसुंगी आणि उरूळीदेवाची गावे पालिकेतून वगळण्याचा तसेच या गावांची नवी नगरपालिका तयार करण्याची घोषणा करण्यात आल्याने इच्छूक उमेदवारांच्या तयारीला मोठा ‘खो’ बसल्याचे चित्र आहे. यामुळे आधीच खर्च करून बसलेले उमेदवाराना पुन्हा खर्चाची तरतूद करावी लागणार आहे.