पुणे : पिंपरी येथील सेवा विकास बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याने त्याच बँकेत शिपाई म्हणून काम करत असलेल्या एका महिलेसोबत अश्लील चाळे करत विनयभंग केल्याचा धकादायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार दीड महिन्यापूर्वी सेवा विकास बँकेच्या पिंपरी येथील मुख्य कार्यालयामध्ये घडला.
मनोज बक्षानी असे गुन्हा दाखल झालेल्या अधिकाऱ्याचे नाव असून या संदर्भात कुणाला सांगितलं तर खोटे गुन्हे दाखल करण्याची आणि नोकरीवरून काढून टाकण्याची धमकी त्याने दिल्याचे देखील तक्रारीमध्ये नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी एका महिला कर्मचाऱ्याने फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला ही सेवा विकास बँकेमध्ये शिपाई म्हणून नोकरी करते. दीड महिन्यापूर्वी आरोपी मनोज बक्षानी याने या महिलेला चहा आणण्यासाठी सांगितले. ही महिला चहा घेऊन गेली असता त्याने टेबलाखाली नीट स्वच्छता केली नसल्याचे दाखवले. आरोपीने तिच्या शरीराला अश्लील स्पर्श करीत विनयभंग केला. त्यानंतर देखील त्याने वारंवार अशा प्रकारची कृत्य केले.
दरम्यान, हा प्रकार सहन न झाल्याने पीडित महिलेने अखेर पोलीस स्टेशनमध्ये धाव घेत फिर्याद दाखल केली. या घटनेमुळे बँकेमध्ये तणावाचे वातावरण पसरले असून अधिकाऱ्यांच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.