मिरज, सांगली : राज्यभरात ग्रामपंचायत निवडणुकीचे वातावरण तापले असताना निवडणुकीच्या प्रचार करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचा मिरज तालुक्यातील सोनी येथील कार्यकर्ता अक्षय उर्फ आकाश माणिक नरुटे यांची हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणात मिरज पोलिसांनी चौकशीसाठी दोघांना ताब्यात घेतले आहे.
या विषयी मिळालेली माहितीनुसार, सध्या ग्रामपंचायत निवडणुकांची तयारी अंतिम टप्प्यात आहे. यावेळी सांगली जिल्ह्याच्या मिरज तालुक्यातील सोनी गावचा अक्षय नरुटे देखील राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रचार करत होता. यावेळी आकाशला काही जणांनी बोलावून घेतले आणि दुचाकीवरून घेऊन गेले. त्यानंतर गावापासून काही अंतरावर असणाऱ्या इंग्लिश स्कूलजवळ धारधार शस्त्रांनी हल्ला करून त्याचा निर्घृण खून केला.
रात्री उशीरापर्यंत आकाश घरी न आल्याने नातेवाईकांनी त्याचा शोध सुरु केला असता, इंग्लिश स्कूलच्या मैदानावर तो रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अवस्थेत आढळून आला. घटनेची माहिती मिळताना मिरज ग्रामीण पोलिसानी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करताना घटनेची नोंद केली. गावातील काही जणांसोबत भांडण झाले असल्याची माहिती मिळाली असून भांडणातून हत्या झाली असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
आकाश याचा मित्रांनी खून केला असल्याची तक्रार प्राप्त झाली असून त्यानुसार दोघांना ताब्यात घेतले आहे. हत्येची अधिक चौकशी सुरु असून हत्या नेमकी कोणत्या कारणाने करण्यात आल्याचा शोध घेत असल्याचे मिरज पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांनी सांगितले. ताब्यात घेतलेल्या दोघांची नावे पोलिसांनी अजून उघड केलेली नाही.