हनुमंत चिकणे
उरुळी कांचन, (पुणे) : पुणे-सोलापूर महामार्गावरील उरुळी कांचन (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील तळवडी चौकात कंटेनरने दिलेल्या धडकेत २२ वर्षाच्या तरुणाचा जागेवरच मृत्यू झाला आहे. बुधवारी (ता. १४) पहाटे पाऊणे चार वाजण्याच्या सुमारास कांचन स्वीट या दुकानासमोर हि घटना घडली आहे.
अविनाश शिवाजी बगाडे (वय-२२, रा. माकरवस्ती, सहजपूर, ता. दौंड) असे अपघातात मृत्यू झालेल्या २२ वर्षीय तरुणाचे नाव आहे. तर आदिनाथ गहिनीनाथ गरजे (वय-४५, रा. कळंबोली कॉलनी, नवी मुंबई) असे कंटेनर चालकाचे नाव आहे. याप्रकरणी कंटेनर चालकाला लोणी काळभोर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अविनाश बगाडे हे त्यांच्या बरोबर असलेल्या मित्राबरोबर पुणे – सोलापूर महामार्गावरील उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीत एका टपरीवर पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास चहा पिण्यासाठी थांबले होते. यावेळी रस्त्याच्या बाजूला छोटा हत्ती उभा असलेल्या ठिकाणी आले होते.
यावेळी सोलापूर बाजूला भरधाव वेगाने एक कंटेनर निघाला होता. या कंटेनरची धडक हि अविनाश बगाडे यांना बसली. धडक एवढी जोरात होती कि, यामध्ये त्यांचा जागेवरच मृत्यू झाला.
दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस व कस्तुरी प्रतिष्ठानचे सदस्य तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पुढील तपास पोलीस करीत आहेत.