पुणे : गावाकडील मित्राला पुण्यात कामाला बोलवीत असाल तर सावधान…! पुण्यात एक धक्कादायक घटना नुकतीच उघडकीस आली आहे. एकाने गावाकडील मित्राला पुण्यात कामाला बोलाविले. त्यानंतर नोकरी दिली, एवढेच काय तर घरात राहायला जागा दिली, मात्र त्या मित्राने विश्वासघात करून मित्राच्या पत्नीचे आंघोळीचे फोटो काढले, आणि ते फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन बलात्कार केला. इतकेच नव्हे तर व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन ब्लॅकमेल करून पैसेही उकळल्याची घटना उघडकीस आली आहे.
याप्रकरणी एका २७ वर्षीय पिडीत विवाहितेने लोणीकंद पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला आणि तिचा पती लातूर जिल्ह्यातील रहिवाशी आहेत. या महिलेचा पती वाघोली परिसरातील एका खाजगी कंपनीत काम करतो. वाघोली परिसरातच ते भाड्याच्या घरात राहतात. या महिलेच्या पतीने गावाकडच्या मित्राला काम मिळवून देण्यासाठी पुण्यात आणले होते. एका पेट्रोल पंपावर त्याला नोकरी देखील मिळाली होती. मात्र राहण्यासाठी जागा नसल्याने त्याला स्वतःच्या घरात ठेवून घेतले. मात्र आरोपी तरुणाने याचा गैरफायदा घेतला.
दरम्यान, मित्र कामाला गेल्यानंतर पिडीत महिला आंघोळ करत असताना, आरोपीने नकळत त्याचा व्हिडिओ रेकॉर्ड केला. हा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन आरोपीने पिडीत विवाहितेवर बलात्कार केला. इतकेच नाही तर हा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन फिर्यादीकडे पैशाची मागणी केली. सुरूवातीला फिर्यादीने भावाकडून इमर्जन्सी कारण सांगत ५० हजार रुपये घेऊन आरोपीला दिले. मात्र त्यानंतरही आरोपीने आणखी साडेतीन लाख रुपये दे अन्यथा बदनामी करेल अशी धमकी दिली.
या सर्वाला कंटाळून फिर्यादीने भावाला हा सर्व प्रकार सांगितला, त्यानंतर भावाने आरोपीला समजावूनही सांगितले. परंतु तो आणखी पैशाची मागणी करत पिडीतेला त्रास देऊ लागला. अखेर दोघांनी मिळून पतीला हा सर्व प्रकार सांगितला आणि त्यांनी पोलिसात तक्रार दिली.
लोणीकंद पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राहुल कोळपे अधिक तपास करत आहेत.