छत्रपती संभाजीनगर: शहरात एका बीसीएसच्या विद्यार्थ्याची राहत्या फ्लॅटमध्ये धारदार शस्त्राने गळा चिरून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शनिवारी महाविद्यालयातील मुलांशी किरकोळ वाद झाला होता .त्यानंतर फ्लॅटवरचे मित्र बाहेर गेले असताना प्रदीप विश्वनाथ निपटे या विद्यार्थ्याची अज्ञातांनी निघृण हत्या केल्याचे समोर आले आहे. मंगळवारी रात्री 11:30 वाजता शहरातील उस्मानपुरा भागात ही धक्कादायक घटना घडली आहे.
या घटनेबाबत अधिक माहिती अशी की, मृत विद्यार्थी बीड जिल्ह्यातील माजलगावचा आहे. तो देवगिरी महाविद्यालयात बीसीएसच्या प्रथम वर्षात शिकत होता. आपल्या मावसभावासोबत तो भाजीवालीबाई पुतळ्याजवळील एका फ्लॅटमध्ये किरायाने राहत होता. शहरातील उस्मानपुरा भाग हा शिक्षणासाठी प्रसिद्ध असून शिकायला आलेली महाविद्यालयीन मुलं येथे मोठ्या प्रमाणात किरायाने रुम करून राहतात.
महाविद्यालयात किरकोळ कारणावरून वाद
मंगळवारी महाविद्यालयातून परत आल्यावर मित्र आणि मावसभाऊ बाहेर गेले होते. प्रदीप एकटाच रूमवर थांबला होता. बाहेर गेलेले मित्र रात्री दहा वाजता परत आले तेंव्हा प्रदीप गळा कापलेल्या रक्तबंबाळ मृत अवस्थेत पडलेला दिसला. महाविद्यालयात किरकोळ कारणावरून वाद झाले होते.संक्रांती दिवशी रात्री मित्र बाहेर गेलेले असताना मारेकऱ्यांनी त्याच्या रुमवर जाऊन मारून टाकल्याचे समोर आले आहे. मित्र फ्लॅटवर परतले तेंव्हा प्रदीप रक्तबंबाळ अवस्थेत आढळून आला. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच उस्मानपुरा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मृत मूळचा बीड जिल्ह्यातला
मृत विद्यार्थ्याचे नाव प्रदीप विश्वनाथ निपटे (वय 19) असे आहे. प्रदीप बीड जिल्ह्यातील पिंपरखेड गावचा रहिवासी होता. शिक्षणासाठी मागच्या सहा वर्षांपासून तो छत्रपती संभाजीनगर येथे राहत होता. छत्रपती संभाजीनगर मधील एका नामांकित महाविद्यालयात बीएससीचे शिक्षण घेत होता. शहरातील उस्मानपुरा भागातील रेड कॉलनीत तो चार मित्रांसोबत भाड्याच्या खोलीत राहत होता. या घटनेने संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाली आहे.