मुंबई : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर राहत्या घरी चोराने चाकू हल्ला केला. यामध्ये चोराने सैफअली खानवर चाकूने वार केले आहेत. त्याच्यावर लिलावती रुग्णालयात उपचार सुरु आहे. या हल्ल्यांनंतर अनेक प्रश्न उपस्थित झाले असून घटनेनंतर कडक सिक्युरिटी असताना देखील चोर घरात शिरला कसा? त्याला कोणी मदत केली? असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत असताना, पोलिसांनी घरातील मोलकरणीबाबत धक्कादायक खुलासा केला आहे.
सैफवर प्राणघातक हल्ला झाल्यानंतर तात्काळ मुंबई पोलिसांचे सात पथक तयार करण्यात आली. या पथकांसह क्राईम ब्रँचचे अधिकारी दया नायकही घटनास्थळी दाखल झाले आहेत. याप्रकरणी घरातील तीन मदतनीस व्यक्तींना ताब्यात घेण्यात आलं आहे. यासर्वांची कसून चौकशी करण्यात येत असून या दरम्यान पोलिसांनी एका मदतनीस महिलेबाबत खळबळजनक माहिती दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सैफवर हल्ला केलेला चोर त्याच्या घरातील मदतनीस महिलेला भेटण्यासाठी गेला होता. करीना कपूरच्या मदतनीस महिलेनेच चोराला घरात एन्ट्री दिली होती. तेव्हा त्यांच्यात बाचाबाची झाली. त्यांच्यातील भांडण ऐकून सैफ जागा झाला. आणि या भांडणात तो पडल्याने त्या व्यक्तीने त्याच्यावर रागात हल्ला केला.
चोराने केलेल्या चाकू हल्ल्यात अभिनेता सैफ अली खान गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर लिलावती रुग्णलयात उपचार सुरु आहेत. सैफवर सहा वार करण्यात आले आहेत. दोन खोलवर जखमा आहेत. त्यापैकी एक मणक्याजवळ आहे. न्यूरोसर्जन डॉ. नितीन डांगे, कॉस्मेटिक सर्जन डॉ. लीना जैन भूलतज्ज्ञ डॉ. निशा गांधी यांच्या नेतृत्वाखालील डॉक्टरांच्या पथकाद्वारे त्यांच्यावर शस्त्रक्रिया केली जात असल्याची माहिती लिलावती डॉक्टरांकडून देण्यात आली आहे.
नेमकं प्रकरण काय?
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सैफ अली खान याच्या मुंबईतील घरात बुधवारी रात्री एका चोराने प्रवेश केला. चोराला पाहून सैफच्या घरातील कर्मचाऱ्यांनी आरडाओरड सुरू केली. त्यावेळी सैफ अली खानला जाग आली. तो खोलीतून बाहेर आल्यानंतर सैफ अली खान आणि चोर समोर समोर आले. यावेळी चोराने आपण पकडलं जाण्याच्या भीतीनं त्याच्याकडील चाकूने सैफ अली खानवर सपासप वार केले. यामध्ये सैफ अली खानला दुखापत झाली आहे. त्याला तातडीनं मुंबईच्या लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सैफ जखमी झाल्यानंतर त्याला तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आले.
हल्ल्याची माहिती मिळताच पोलिसांनी सैफच्या घरी धाव घेत तात्काळ चौकशी सुरू केली. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहेत. पोलिसांनी तात्काळ सीसीटीव्ही फुटेज आणि इतर माहितीच्या आधारे चोराचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. चोरानं घरात शिरण्यापूर्वी घराची रेकी केली असल्याचा संशय सुद्धा व्यक्त करण्यात येत आहे.