दीपक खिलारे
इंदापूर : राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रपिता महात्मा फुले, भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर व कर्मवीर भाऊराव पाटील या महापुरुषांविरोधात केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ मंगळवारी (दि. १३) ‘इंदापूर बंद’ चे आवाहन समस्त शिवाय, शाहू, फुले व आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्यांच्या वतीने करण्यात आले आहे.
या आशयाचे निवेदन इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक टी. वाय. मुजावर यांना सोमवारी (दि.१२) देण्यात आले.
सदर निवेदनात म्हटले आहे की, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी औरंगाबाद येथील कार्यक्रमात ” शाळा सुरु करण्यासाठी महात्मा ज्योतिबा फुले, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर व कर्मवीर भाऊराव पाटील यांनी लोकांकडे भीक मागितली. या आक्षेपार्ह व बदनामीकारक वक्तव्याने समस्त बहुजन समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत.
याच भावनेतून आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी चंद्रकांत पाटील यांचेवर काळी शाईफेक केली. संबंधित आंबेडकरी कार्यकर्त्यांवर तसेच पत्रकारांवर खोटे गुन्हे दाखल केले आहेत. सदरचे दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावेत व पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा या मागणीसाठी समस्त शिव-शाहू-फुले-आंबेडकर चळवळीच्या वतीने मंगळवारी दि.१३ रोजी इंदापूर बंदचे आवाहन केले आहे.
निवेदन देते समयी बहुजन क्रांती मोर्चाचे इंदापूर तालुकाध्यक्ष सुरज धाईंजे, इंडियन लाॅयर असोसिएशनचे अॅड. सुरज मखरे, गोरख भोसले,सलीम शेख, शनिदेव जाधव, नानासाहेब चव्हाण, शितल पलंगे, अक्षय मखरे, महेश सरवदे, वंचित आघाडीचे हनुमंत कांबळे,अॅड. बापुसाहेब साबळे,दया मखरे आदी उपस्थित होते.