अक्षय टेमगिरे
रांजणगाव गणपती : शिरूर तालुक्यातील पिंपळसूटी शिरसगाव काटा शिवेवर दुसरा बिबट्या जेरबंद झाला असला तरी लहानग्या मुलीवर हल्ला करणारा तो नरभक्षक बिबट्या अजूनहि जेरबंद झाला नसल्याने नागरिकांची वनविभागाकडे तो बिबट्या लवकरात लवकर जेरबंद व्हावा अशी अपेक्षा पिंपळसुटी येथे नागरिकांनी केली आहे.
पकडलेला बिबट्या हा आक्रमक दिसत असल्याने जमलेल्या नागरिकांनी बिबट्या पिंजऱ्यात एवढा आक्रमक असेल, तर तो बाहेर फिरताना किती आक्रमक असेल? असे म्हणून भीती व्यक्त केली आहे.
पकडण्यात आलेले हा बिबट्या मादी जातीचा असून त्याचे वय अंदाजे अडीच ते साडेतीन वर्ष आहे. शिरसगाव काटा, पिंपळसूटी, मांडवगण फराटा वडगाव रासाई रांजणगाव सांडस, इनामगाव, निर्वी, कोळगाव डोळस, हा शिरूर तालुक्यातील पूर्व भाग मोठ्या प्रमाणात उसाचा भाग असून सध्या ऊस तोडणी सुरू आहे. त्यामुळे लपण्यास जागा न राहिल्याने हे बिबटे सैरभैर झाले आहेत.
24 डिसेंबर रोजी रात्री सातच्या दरम्यान पिंपळसुटी येथील नदीकिनारी राहणाऱ्या रक्षा अजय निकम या दोन वर्षीय चिमुरडीवर बिबट्याने हल्ला करून तिला ठार केले होते, त्या आधी मांडवगण फराटा येथे वंश सिंग व शिवतेज टेंभेकर या दोन लहानग्या मुलांचा जीव या बिबट्यांनी केलेल्या हल्ल्यात गेला होता.
त्यानंतर या भागातील नागरिक आक्रमक झाले होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पिंपळसूटी, मांडवगण फराटा वडगाव रासाई या परिसरात बिबट्या पकडण्यासाठी वन विभागाच्या वतीने पिंजरे लावून, सीसीटीव्ही कॅमेरे लावून बिबट्या पकडण्यासाठी प्रयत्न सुरू केले.
वन विभागाच्या वतीने पिंजरे लावण्यात आले आहे. परंतु 24 डिसेंबर रोजी मुलीवर हल्ल्या करून तिचा जीव घेणारा नरभक्षक बिबट्या अद्याप जेरबंद झाला नसल्याने स्थानिक नागरिकांमध्ये आजही भीतीचे वातावरण आहे. तो बिबट्या लवकरात लवकर जेरबंद व्हावा, असे घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक शशिकांत वेताळ यांनी सांगितले.
दि. 7 जानेवारी रोजी पिंपळसूटी येथे बिबट्या जेरबंद झाल्यानंतर दि. 15 जानेवारी रोजी पहाटेच्या दरम्यान तीन वर्षाचा मादी बिबट्याही जेरबंद करण्यात आला आहे. त्याला वन विभागाच्या वतीने माणिक डोह बिबट्या निवारण केंद्रात सोडण्यात आले आहे.
भानुदास शिंदे, वनपाल