लोणी काळभोर : घर का भेदी लंका ढाए! या वाक्य प्रयोगाप्रमाणे वडकी ( ता. हवेली) येथील मोडक इंटरनॅशनल स्कूल या इंग्रजी माध्यमाच्या शाळेच्या संपूर्ण तिजोरी सांभाळण्याची जबाबदारी असलेल्या महिला लेखापालानेच शाळेच्या तिजोरीवर डल्ला मारून सुमारे 17 लाखांचा अपहार उघडकीस आला आहे. याप्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी तत्काळ महिलेला अटक केली आहे.
शितल व्यंकटेश गोरे (वय 40, पत्ता सर्वे नंबर 215 संस्कृती कॉलनी, भेकराई नगर फुरसुंगी पुणे) असे अटक करण्यात आलेल्या शाळेच्या लेखापाल महिलेचे नाव आहे. याप्रकरणी संस्था चालक संजय वसंत मोडक (वय 53, रा. डी-701, पर्ल टॉवर, गाडीतळ हडपसर पुणे) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
लोणी काळभोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय मोडक हे एक शैक्षणिक संस्था चालक असून त्यांची वडकी ( ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत मोडक इंटरनॅशनल स्कूल या नावाने इंग्रजी माध्यमाची शाळा आहे. तर मोडक यांच्या शाळेमध्ये शितल गोरे या लेखापाल म्हणून काम करीत होत्या.
शितल गोरे यांनी 10 जानेवारी 2023 ते 21 जून 2925 या कालावधीत शैक्षणिक शुल्काचे 8 लाख 49 हजार 300 रुपये, प्री प्रायमरी शुल्काचे 1 लाख 57 हजार 278 रुपये व स्कुल युनिफॉर्म शुल्काचे 4 लाख 38 हजार 810 रुपये असे एकुण 14 लाख 45 हजार 388 रुपयांचा परस्पर अपहार करुन संस्थेची फसवणुक केली आहे. तसेच ही फसवणुक लपवण्यासाठी शितल गोरे यांनी मोडक इंटरनॅशलन स्कुलच्या कार्यालयात अनाधिकृतपणे प्रवेश करुन केबीनमधील 2 लाख 44 हजार रुपयांची रोकड असा एकूण 16 लाख 89 हजार 388 रुपयांचा अपहार केला आहे. तसेच हिशोबाचे 8 रजिस्टर, पावत्या बुक इत्यादी चोरुन नेले आहे.
याप्रकरणी संजय मोडक यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार शितल गोरे यांच्यावर भारतीय दंड संहीता कलम 420, 406, 381 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल होताच, लोणी काळभोर पोलिसांनी शीतल गोरे यांना मोठ्या शिताफीने अटक केली आहे.
ही कामगिरी हडपसर परिमंडळ पाच चे पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र करणकोट, पोलीस उपनिरीक्षक रत्नदीप बिराजदार, पोलीस नाईक दिगंबर जगताप, अंमलदार मंगेश नानापुरे, संदीप धुमाळ, व मल्हारी ढमढेरे यांच्या पथकाने केली आहे.